दहावीच्या महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर शेवटच्या क्षणी घ्यावयास लागणाऱ्या दक्षता व अभ्यासाचे योग्य वेळापत्रक कशा पद्धतीने करावे याविषयी अनमोल मार्गदर्शन करीत, बीजगणित व भूमितीमध्ये अधिक गुण मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या साध्या-सरळ क्लुप्त्या सांगत, ‘लोकसत्ता यशस्वी भव’चे तज्ज्ञशिक्षक कैलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती फारच सोप्यारीत्या दूर केली. आमदार निरंजन डावखरे यांच्या सहयोगाने ठाणे येथील बाल विद्यामंदिर शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता यशस्वी भव’चे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संचालक सचिन मोरे यांचा विशेष सहभाग या शिबिरास होता. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विमल गोळे यांनी लोकसत्ताच्या तज्ज्ञ शिक्षकांचे आभार व्यक्त केले.