जलसंपदा विभागाचा पालिकेला इशारा
पुणे शहरासाठी खडकवासला धरणातून घेतल्या जाणाऱ्या पाण्याचे मीटर गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहेत. हे मीटर एका महिन्यात दुरुस्त करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला केल्या असून, तसे न झाल्यास पुण्याच्या पाण्यासाठी सव्वापट दर आकारण्याचा इशाराही दिला आहे.
पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणी पुरवले जाते. यापैकी जवळजवळ ७५ टक्के पाणी बंद पाईपलाईनने दिले जाते. हे पाणी पर्वती, वारजे आणि लष्कर येथीप पंपिंग स्टेशनजवळ उचलले जाते. तिथे मीटरने पाण्याची मोजणी केली जाते. मात्र, वारजे येथील पाणी मोजण्याचा मीटर दीड महिन्यापासून नादुरुस्त आहे, तर लष्कर येथे मीटरच नाही. खडकवासला धरणासही पुणे महापालिकेने पाणी मोजण्यासाठी मीटर बसवलेला नाही. त्यामुळे हे पाणी मोजून घेतले जात नाही, असा जलसंपदा विभागाचा आक्षेप आहे. त्यामुळेच या विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवडय़ात पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे व्ही.जी. कुलकर्णी यांच्याशी बैठक केली. हे मीटर एका महिन्यात दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या. तसे न केल्यास पुण्याला पुरविल्या जाणाऱ्या पाण्याला सव्वापट दर आकारण्याचा इशाराही जलसंपदा विभागाने दिला आहे.
पुण्यासाठी जेथून पाणी उचलले जाते, त्या पंपिंग स्टेशनप्रमाणेच खडकवासला येथेही महापालिकेने पाण्याचा मीटर बसवावा, अशी या विभागाची गेल्या दोन-तीन वर्षांपासून मागणी आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही. आता दीडपट दर आकारताना जलसंपदा विभागाने शासन नियमावर बोट ठेवले आहे. पाण्याचा मीटर नसल्यास त्या ठिकाणी सव्वापट दराने पाणी पुरविण्याचा शासनाचा नियम आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या पुणे क्षेत्राचे अधीक्षक अभियंता ईश्वर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या माहितीला दुजोरा दिला.