गतवर्षी शेतक-यांच्या ऊस दर आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे ऐन दिवाळीत निर्माण झालेल्या कटू घटनांची आठवण आजही पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनावर कोरली गेली आहे. आंदोलनाचा भडका उडाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर पाणी फेरले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामुळे जनभावनेचा प्रक्षोभ निर्माण झाल्याची दखल घेत यंदा शेतकरी संघटनांनी सध्या तरी आंदोलनाला संयम घातला असून दिवाळीनंतर आंदोलनाचा आपटबार फोडण्याचे ठरविले आहे. परिणामी यंदाची दिवाळी कोणत्याही तीव्र आंदोलनाच्या अडथळ्याविना पार पडणार असल्याने जनतेमध्ये दिवाळीची गोडी वाढीस लागली असल्याची प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. ऊस आंदोलनाच्या जोडीने अन्य आंदोलनाच्या पातळीवरही शांतता नांदत असल्याने प्रशासन व पोलीस यंत्रणेने सुस्कारा सोडला आहे.     
ऊस दराचा गेल्या दशकभराचा आढावा घेता गतवर्षीचे आंदोलन हे सर्वाधिक संघर्षमय बनले होते. उसाची पहिली उचल मिळण्यावरून विविध शेतकरी संघटनांनी दस-यापासूनच आंदोलनाचा हाकारा घातला होता. तो उत्तरोत्तर वाढत जाऊन ऐन दिवाळीच्या वेळी तर त्याचा स्फोट झाला होता. पहिली उचल मागण्यामध्ये शेतकरी संघटनांमध्ये तेव्हाही मतभेद होते. शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना २९०० रुपये, रघुनाथदादा पाटील ४ हजार रुपये, स्वाभिमानीचे राजू शेट्टी ३ हजार रुपये अशी वेगवेगळी मागणी असली, तरी या तिन्ही प्रमुख संघटना सांगली येथे एकत्रित आल्या होत्या. त्यांनी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी १९ नोव्हेंबर रोजी २०१२ रोजी पहिली उचल २५०० रुपये देण्याच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवित ३ हजार रुपये पहिली उचल घेण्यावर ठाम राहण्याचे ठरविले होते. त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढीस लागली होती.    
सांगली जिल्ह्य़ातील वसगडे या गावी आंदोलनकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी व पोलिसांच्या जोरदार चकमक झाली. पोलीस गोळीबारात एका तरुण शेतक -याला जीव गमवावा लागला. खासदार राजू शेट्टी यांना अटक झाली. या घटनेवरून शेतक -यांचे आंदोलन चांगलेच पेटले. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्य़ातील अनेक गावात आंदोलनाला हिंसक वळण लागले. रास्ता रोको, दगडफेक, आग लावणे, पोलीस व त्यांच्या वाहनांना लक्ष करणे, झाडे पाडून व टायरी पेटवून वाहतूक रोखणे अशा अनेक प्रकारांमुळे आंदोलन वादळी ठरले. ऐन दिवाळीच्या वेळी तर आंदोलन अधिकच भडकले. राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा मार्ग वाहतुकीस बंद झाल्याने दिवाळी सणासाठी घरी जाणा-या लोकांची चांगलीच कोंडी झाली. अनेकांना एक-दोन दिवस बसस्थानकातच आसरा घ्यावा लागला. दिवाळीच्या पहाटे अभ्यंगस्नानाने शुर्चिभूत होणे अपेक्षित असताना शेकडो प्रवाशांना तोंड धुण्यासाठी पाणीही मिळणे कठीण झाले होते. यावरून दीपावलीच्या सणावर कसे विरजण पडले याचा अंदाज यावा. शेतक -यांच्या बेबंद आंदोलनावरून सामान्य नागरिकांत नाराजीचा सूर स्पष्टपणे उमटला जावून या आंदोलनाविषयीची सहानभूती गमावली गेली.     
गतवर्षीचा दिवाळीसणाचा हा कटू अनुभव शेतकरी संघटनांनाही बरेच काही शिकवून जाणारा होता. जनतेच्या कडवट प्रतिक्रियापासून बोध घेतलेल्या शेतकरी संघटनांनी यंदा दिवाळी पूर्वी मोठय़ा आंदोलनाला हात घालायचा नाही, अशी मनाशी खूणगाठ बांधली आहे. काही गावात किरकोळ आंदोलन, रास्ता रोकोसारखे प्रकार घडले असले, तरी त्याचा जनजीवनावर तसेच दिवाळी सणाच्या आनंदावर परिणाम घडलेला नाही. ८ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिषद होणार असून त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. अर्थात, या आंदोलनाची धार गतवर्षीइतकीच संघर्षपूर्ण राहणार की कसे याचा अद्याप प्रशासनालाही अंदाज आलेला नाही.
 आंदोलने विसावली
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर उसाची पहिली उचल, कामगारांच्या बोनसचा टोकदार संघर्ष, खास दिवाळीसाठी रेशनवर धान्य, साखर, तेलाचा पुरेसा पुरवठा होण्यासाठीचे आंदोलने यामुळे दिवाळीपूर्वीच वातावरण तापलेले असे. यंदा मात्र या सर्वच पातळ्यांवर शांतता सुखनैवपणे नांदत आहे. विनाव्यत्यय, शांतता सुव्यवस्थेला बाधा न पोहोचता दिवाळी पार पडत असल्याने प्रशासन निश्चिंत असून पोलीस यंत्रणाही अंमळ विसावली आहे. नाही म्हणायला आयआरबी व टोलविरोधातील फटाके फुटत असले, तरी प्रशासनाने नऊ टोल नाक्यांवरील जमावबंदी आदेश १५ नोव्हेंबपर्यंत वाढविल्याने तेथेही सध्या आंदोलनाला धार नाही.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 year to action of the constitution in sugarcane movement of kolhapur
First published on: 02-11-2013 at 02:07 IST