सर्जेपुरा येथे रविवारी (दि.१०) झालेल्या दोन गटातील भांडणात पोलिसांनी आज सकाळी दोन्ही बाजूंच्या ११ आरोपींना अटक केली. त्यात नगरसेवक अरीफ शेख तसेच जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांचा समावेश आहे.
या सर्वाची न्यायालयात जामीनावर सुटका झाली. त्यांच्यावर पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला होता. नगरसेवक अरीफ व लांडगे वगळता अन्य आरोपींची नावे याप्रमाणे- सचिन चंद्रकांत फुला, महेश मुरलीधर दांगट, बाबू निस्ताने, निलेश बाबा वाघ, कुणाल राजेंद्र भोसले, शेख सद्दाम गफूर, शेख मन्सुर बाबूलाल, शेख इम्रान निसार, शेख अरीफ आदील.
पोलीस उपनिरीक्षक नीता उबाळे यांनी या सर्वाना अटक केली. हे सर्वजण सर्जेपुरा येथे राहणार असून त्यांच्यात दोन गट आहेत. या दोन्ही गटात कायम भांडणे होत असतात. त्याला लहान मुलांमध्ये झालेल्या एका जुन्या भांडणाचा संदर्भ आहे. रविवारी एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. दगडफेक करण्यात आली. पोलीस आल्यावर सगळेच फरार झाले.
त्यानंतर काही राजकारण्यांनी पोलीस चौकीत जाऊन रदबदली करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना त्यांना दाद दिली नाही. पण दोन्ही गटातील कोणीही फिर्याद देण्यासाठी आले नाही, त्यामुळे पोलिसांची अडचण झाली. त्यातुनही त्यांनी मार्ग काढला व स्वत:च फिर्यादी होत वरील आरोपींवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. आज त्यांना अटक करून न्यायालयात नेण्यात आले, तिथे त्यांची जामीनावर सुटका झाली.