येथील राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या संकेश्वरनजीक हिरण्यकेशी नदीपात्रात १३ अर्भके सापडली आहेत.  कोल्हापूरपासून साठ कि.मी अंतरावर असलेल्या संकेश्वर तालुक्यातील या घटनेने आरोग्य खाते हादरून गेले आहे.  एका वाटसरूने ही माहिती पोलिसांना दिली असता ही बाब उघडकीस आली. आज सकाळी या व्यक्तीस तेथून जात असताना ही अर्भके दिसली. तेथे एकूण तेरा अर्भके आज सापडली आहेत. गेल्या रविवारीही तिथे तीन अर्भके सापडली होती त्यानंतर आज एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अर्भके सापडल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. बेळगाव येथून आरोग्य अधिकारी तिकडे रवाना झाले असून त्यांनी ती अर्भके बेळगाव येथे आणली आहेत, आता या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. ही अर्भके स्त्री किंवा पुरुष लिंगाची आहेत हे समजू शकले नाही. हा स्त्री भ्रूणहत्येचा प्रकार आहे की काय हे उघड झालेले नाही. ही अर्भके चिखलाने माखलेली होती व तेथील दृश्य फार विदारक होते, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. हा एकतर स्त्री भ्रूणहत्येचा प्रकार असावा किंवा एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला अभ्यासासाठी देण्यात आलेली अर्भके ही रीतसर विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी टाकून देण्यात आली असावीत अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.