जिल्ह्य़ातील १३ तालुक्यातील रस्त्याची निकृष्ट अवस्था बघता रस्त्याच्या बांधकामासाठी राज्य शासनाने १४.४५ कोटी रुपये मंजूर केले आहे. हा निधी मिळाल्याने जिल्ह्य़ातील गावोगावच्या नागरिकांची अडचण दूर होणार आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी सांगितले, जिल्ह्य़ातील रस्ते बांधकामासाठी किमान गरजा कार्यक्रमांतर्गत प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे जिल्हा परिषदेतर्फे पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने एकूण १०८ कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे. या कामाची अंदाजित रक्कम १४ कोटी ४५ लाख आहे. सध्या स्थितीत या विकासकामासाठी ७६६०.८ लाखाचा निधी प्राप्त झाला असून या कामांना तातडीने सुरुवात करण्यात येणार आहे. १२ रस्ते बांधकामासाठी सर्वाधिक १७५ लाखाचा निधी नागपूर ग्रामीण भागाला मिळाला. त्यानंतर ११ कामांसाठी काटोलला १३५ लाख, ९ कामांसाठी नरखेडला १३० लाख, सावनेर १२० लाख, पारशिवणीला ९५ लाख, मोद्याला ११० लाख, रामटेकला ९५ लाख, कुहीला ८० लाख, कामठीला ६० लाख, उमरेडला ८० लाख, हिंगण्याला १६५ लाख व भिवापूरला १२० लाख व कळमेश्वरला ८० लाखाचा निधी देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील रस्ते चांगले व्हावे यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.