गोंदिया निसर्ग मंडळ आणि महाराष्ट्र पक्षीमित्रांच्या विदर्भ शाखेद्वारे साकेत पब्लिक शाळेच्या आवारात चौदाव्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनाचे उदघाटन आज ज्येष्ठ वन्यजीव छायाचित्रकार एम.आर.शाद यांच्या हस्ते आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमात मान्यवरांनी प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्य़ात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या सारस आणि काळवीटांच्या बचावासाठी कळवळा व्यक्त केला.
संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली यांच्या छायाचित्राला हारार्पण करून आणि दीप पूजनाने करण्यात आले. यावेळी वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक व्ही.व्ही.गुरमे, गोंदिया निसर्ग मंडळाचे चेतन बजाज, ज्येष्ठ वन्यजीव संरक्षक गोपाल ठोसर, उपवनसंरक्षक एस.व्ही.रामाराव, भरत जसानी, सहायक उपवनसंरक्षक अश्विन ठक्कर, मधुसूदन अग्रवाल, शिव शर्मा, डॉ.अनिल िपपळापुरे, पूर्व संमेलनाध्यक्ष कौस्तुभ पंढरीपांडे, डॉ.प्रकाश धोटे, राजकमल जोब, रवी कासलीवाल, अनिल वाढी, स्वागताध्यक्ष व मानद वन्यजीव संरक्षक सावन बाहेकार यांच्यासह विदर्भातील पक्षीमित्र आणि निसर्गप्रेमी उपस्थित होते. गोंदिया निसर्ग मंडळ ही संस्था निसर्गाच्या संवर्धन आणि संरक्षण करणारी संस्था आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून झाडे आणि फुलांचा सडा पसरू नये, करिता आयुर्वेदाने बहुउपयोगी मानलेल्या तुळशीचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले.
याप्रसंगी बोलतांना आमदार राजेंद्र जैन यांनी सगळीकडे पक्षी आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश सत्तरीच्या दशकापासून सुरू झाला, मात्र गोंदिया आणि भंडारा हे दोन्ही जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. तलावांच्या माध्यमातून येथील जनतेने नेहमीच पक्षी आणि प्राण्यांच्या संवर्धनाचे कार्य सुरू ठेवले असल्याचे सांगितले, तर प्रास्ताविकातून गोंदिया निसर्ग मंडळाचे मुकुंद धुर्वे यांनी गोंदिया जिल्ह्य़ात सातपुडा फाऊंडेशनच्या माध्यमातून पक्षी, निसर्ग आणि प्राणी रक्षणाची सुरुवात करण्यात आली. त्याचे रूपांतर गोंदिया निसर्ग मंडळात झाले. २००४ मध्ये या जिल्ह्य़ात फक्त दोन सारस आणि दोन काळवीट होते, परंतु आज सारसांची संख्या ६३, तर काळविटांची संख्या ९८ वर पोहोचली आहे. या संस्थेला किर्लोस्कर पुरस्कारासह बीएनएचएस या संस्थेचा ५० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
 नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्य़ाला लाभले आहे. या ठिकाणी देशी-विदेशी पक्ष्यांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे दूरवरून पक्षीप्रेमी त्यांना बघण्याकरिता हजेरी लावतात. विदर्भच नव्हे, तर देशातही हे स्थळ नावारूपास यावे, याकरिता नवेगावबांध अभयारण्य पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करून त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असल्याचे याप्रसंगी वन्यजीव विभाग गोंदियाचे उपवनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी सांगितले.  
या कार्यक्रमाचे औचित्य साधून गोंदिया निसर्ग मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘सारसगान’या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच विदर्भ पक्षीमित्र मंचाचे संस्थापक रमेश लाडखेळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा प्रथम पुरस्कार ज्येष्ठ पक्षी संशोधक व संरक्षक नागपूरचे गोपाल ठोसर यांना देण्यात आले. त्याचप्रकारे सलग सहा महिने पक्षी संरक्षण आणि संशोधनाचे कार्य जो सदस्य करेल त्याला शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची घोषणा याप्रसंगी विदर्भ पक्षीमित्र मंचाचे डॉ.अनिल पिंपळापुरे यांनी केली.
उदघाटनानंतर छायाचित्र प्रदर्शनाचेही मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. संमेलनाची संकल्पना ‘पाणथळ पक्षी अधिवास व संरक्षण उपाय’ ही आहे. आड व उद्या सारस संवर्धन, संरक्षण आणि सद्यस्थिती, पाणथळ अधिवासातील पक्षीजीवन, सारस संवर्धन संरक्षणात्मक उपाय, पाणथळ पक्षी अधिवासाचे संरक्षणात्मक कार्य योजनेकरिता सूचना व प्रस्ताव या विषयांवर मार्गदर्शन करण्यात      येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन अपूर्व अग्रवाल यांनी, तर आभार अशोक पडोले यांनी मानले. आयोजनाकरिता ईश्वरदयाल गुप्ता, माधुरी नासरे, बलबिरसिंग बग्गा, उमेंद्र भेलावे, अशोक पारधी, गौरव तुरकर, संजय भेंडारकर आदी प्रयास केले.