scorecardresearch

लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे १९ रुग्ण दाखल

डेंग्यूचे रुग्ण फार कमी प्रमाणात आढळून येत असल्याचा दावा आरोग्य विभाग करत असतानाच शहरातील विविध रुग्णालयात डेंग्यूचे २८ रुग्ण दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हिंगणा मार्गावरील डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे १९ रुग्ण दाखल असून त्यातील दोघांची स्थिती …

डेंग्यूचे रुग्ण फार कमी प्रमाणात आढळून येत असल्याचा दावा आरोग्य विभाग करत असतानाच शहरातील विविध रुग्णालयात डेंग्यूचे २८ रुग्ण दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हिंगणा मार्गावरील डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे १९ रुग्ण दाखल असून त्यातील दोघांची स्थिती चिंताजनक आहे. त्याचप्रमाणे संशयित डेंग्यूचे मेडिकलमध्ये ६ तर मेयोमध्ये ३ रुग्ण दाखल आहेत.
सध्या ग्रामीण भागामध्ये डेंग्यूने डोके वर काढले आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी कचरा व साचलेल्या पाण्याचे डबके दिसून येत आहे. यामुळे डासांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होत आहे. डेंग्यू हा आजार एडिस्् इजिप्ती या डासांपासून होतो. हा डास दिवसाच चावतो. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांपैकी पंधरा रुग्ण हे दोन ते पंधरा वयोगटातील आहेत. तर अन्य चार रुग्ण हे पंधरा वर्षांंच्या वरील आहेत. हे रुग्ण वाडी, काटोल, नरखेड, सावनेर, पारशिवनी व रामटेक या भागातील आहेत. या रुग्णांना ताप आल्याने त्यांनी इतरत्र उपचार केला. परंतु त्यांची प्रकृती न सुधारल्याने त्यांनी लता मंगेशकर रुग्णालयात धाव घेतली.
१९ रुग्णांपैकी दोन रुग्णांची स्थिती चिंताजनक असली तरी ते औषधोपचाराला प्रतिसाद देत आहे. तर अन्य रुग्णांच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असल्याची माहिती लता मंगेशकर हॉस्पिटलमधील बालरोग विभाग प्रमुख डॉ. व्ही. दांडगे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या सर्व रुग्णांमध्ये डेंग्यूचे लक्षण आढळून आली आहेत. त्या लक्षणावरून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. यापूर्वी डेंग्यू आजारातून बऱ्या झालेल्या दोन रुग्णांना हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे. या सर्व रुग्णांची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. डेंग्यूमध्ये तीन प्रकार आहेत. त्यातील एकच प्रकार हा अत्यंत घातक जीवघेणा आहे. त्यात रुग्णाच्या रक्ताचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे त्याला रक्त देणे अत्यावश्यक असते. सध्या या प्रकारातील एकही रुग्ण हॉस्पिटलमध्ये नाही. काही रुग्ण चार-पाच दिवसांतच बरे होतात. तर काही रुग्णांना दहा ते पंधरा दिवसही लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
डेंग्यू आजारावर सध्या लस उपलब्ध नाही. या आजारावर लक्षणे पाहूनच उपचार करावे लागतात. लस निर्माण झाली तर अन्य आजाराप्रमाणेच डेंग्यूवर आळा घालणे सोपे होईल. सध्या मेंदूज्वरावर लस उपलब्ध आहे. डेंग्यू, मलेरिया हे आजार होऊ नये, डासाची उत्पत्ती थांबवणे हेच महत्त्वाचे आहे. शासन हे काम करू शकत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असेही डॉ. दांडगे यांनी सांगितले. तसेच लहान मुलांना ताप आल्यास त्याला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मेडिकलमध्ये पाच ते पंधरा वयोगटातील ६ तर मेयोमध्ये ३ डेंग्यूच्या संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यांच्या चाचणीचे अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. यानंतरच त्यांना डेंग्यू झाला किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त ( Nagpurvidharbh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 19 dengue patient admitted in lata mangeshkar hospital

ताज्या बातम्या