नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची जीवनरेखा असणारे भंडारदरा धरण आज पूर्ण भरले. दुपारी २ वाजता धरणाच्या स्पीलवेचे दोन्ही दरवाजे एक फूट वर उचलण्यात आले आणि जलाशयातील पाणी आवेगाने प्रवरेच्या पात्राकडे झेपावले. सन १९६७ मध्ये ऑगस्टच्या २ तारखेलाच धरण भरले होते. त्यानंतर ४६ वर्षांनी त्याच तारखेला धरण भरण्याचा योग जुळून आला.
एका बाजूला कळसूबाईची डोंगररांग आणि दुसरीकडे रतनगड यांच्यामधील १२२ चौ.कि.मी क्षेत्र हे भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. पाणलोटात घाटमाथ्यावर सरासरी ५ हजार ४६० मिमी तर धरणस्थळावर ३ हजार २२५ मिमी पाऊस पडतो. पाणलोट क्षेत्रातील घाटघरला ६ जूनला पावसास सुरुवात झाली. तेव्हापासून सलग ५८ दिवस पावसात खंड पडलेला नाही. तर रतनवाडी व पांजरे येथे ९ जूनपासून असाच सलग पाऊस पडत आहे. पावसाने सातत्य राखल्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ातच धरण भरण्याचा योग ब-याच वर्षांनंतर जुळून आला. धुवाधार म्हणता येईल असा पाऊस पाणलोटात विशेष झाला नाही, पण पावसात खंडही पडला नाही. पहिले काही दिवस पावसाचा जोर विशेष नव्हता. महिनाभरापासून तो वाढला. गेले दहा दिवस पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे ११ हजार ३९ दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण आज भरले. सकाळी ६ वाजता धरणातील पाणीसाठा १० हजार ३२३ दलघफू, ९ वाजता १० हजार ३७६, १२ वाजता १० हजार ४५४ दलघफू होता. दुपारी २ वाजता धरणातील पाणीसाठा १० हजार ५५० दलघफू होताच धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. धरणाच्या स्पीलवेतून २ हजार ४३६ व वीज केंद्रातून ८१९ असे ३ हजार २५५ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. धरणात होणारी पाण्याची आवक जोरदार पावसामुळे वाढत असल्यामुळे दुपारी ४.३० नंतर सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण ९ हजार ८५१ क्युसेक करण्यात आले. १५ सप्टेंबपर्यंत धरणातील पाण्याची पातळी २१३.७० फूट आणि साठा १० हजार ५०७ द.ल.घ.फू स्थिर ठेवण्यात येणार आहे. यापेक्षा धरणात जास्त जमा होणारे पाणी ओव्हरफ्लोच्या रुपात सोडण्यात येणार आहे.
भंडारदरा धरणातून सोडण्यात येणारे पाणी निळवंडे धरणात जमा होते त्यामुळे एक दोन दिवसातच निळवंडे धरणही ओव्हरफ्लो होईल व प्रवरेचे पाणी जायकवाडीकडे झेपावेल. निळवंडे धरणात यावर्षी ५ हजार २१० द.ल.घ.फू पाणीसाठा करण्यात येणार आहे. या धरणात आज सकाळी ४ हजार ३६ द.ल.घ.फू पाणीसाठा होता.
२७० फूट उंचीचे दगडी भंडारदरा धरण बांधले तेव्हा देशातील सर्वाधिक उंच धरण होते. सभोवतालच्या परिसरामुळे भंडारद-याला एक वेगळेच सौंदर्याचे परिमाण लाभले आहे. जूनपासून सुरु असणा-या पावसामुळे भंडारद-याचा परिसर चैतन्यदायी बनला आहे. मृग नक्षत्रापासून विधात्याच्या कुंचल्यातून साकार होत असणारे निसर्गचित्र, भंडारद-याचा जलाशय तुडुंब भरल्यामुळे आता परिपूर्ण झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Aug 2013 रोजी प्रकाशित
भंडारदरा भरले, दोन दरवाजे वर उचलले
नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची जीवनरेखा असणारे भंडारदरा धरण आज पूर्ण भरले. दुपारी २ वाजता धरणाच्या स्पीलवेचे दोन्ही दरवाजे एक फूट वर उचलण्यात आले आणि जलाशयातील पाणी आवेगाने प्रवरेच्या पात्राकडे झेपावले.
First published on: 03-08-2013 at 02:02 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 doors opened of bhandardara