गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कार्यकत्रे जोरदार तयारी करीत असून मिरजेच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरणाऱ्या भव्यदिव्य २१ स्वागत कमानी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर उभारण्यात आल्या आहेत. यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज असून तब्बल ११०० पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तनात करण्यात आला आहे. चालू वर्षी अनंतचतुर्दशी १  दिवस अगोदर आल्याने ९ व्या दिवसापाठोपाठ अंतिम दिवसाचे विसर्जन आल्याने पोलिसांना सलग ४८ तासाहून अधिक कालावधीसाठी दक्ष राहावे लागणार आहे.
सांगली-मिरजेतील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून मंगळवारी देखावा पाहण्याची संधी साधण्यासाठी गणेशभक्तांची धांदल उडाली आहे. देखावे पाहण्याबरोबरच नव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुका पाहण्याचाही योग गणेशभक्तांना लाभला आहे. सांगलीत ४० ते ५० गणेश मंडळांच्या मंगळवारी विसर्जन मिरवणुका होत्या. तर मिरजेत ११० हून अधिक मंडळांच्या मिरवणुका काढण्यात कार्यकत्रे व्यस्त होते. ढोलताशांबरोबरच बॅन्ड पथकांचाही समावेश यंदाच्या मिरवणुकीत मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे.
सर्वात दीर्घकाळ चालणारी विसर्जन मिरवणूक म्हणून पुण्यानंतर मिरजेचा उल्लेख केला जातो. लक्ष्मी मार्केट ते गणेश तलाव हा सुमारे दीड किलोमीटरचा एकच विसर्जन मिरवणूक मार्ग असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना गृहरक्षक दल, राज्य राखीव दल आणि पोलीस मित्र संघटनेची मदत घ्यावी लागते.
विसर्जन मिरवणूक मार्गावर चालू वर्षी तब्बल २१ स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. ६० फुटाहून अधिक उंच असणाऱ्या या स्वागत कमानी गणेशभक्तांचे लक्ष वेधणाऱ्या ठरल्या आहेत. संभाजी तरुण मंडळाने रणांगणावर जात असलेल्या गणरायाचे चित्र रेखाटले आहे, तर विश्वशांती मंडळाने प्रभू रामचंद्रांची प्रतिमा स्वागत कमानीवर रेखाटली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांची छबी किसान चौकात उभारलेल्या स्वागत कमानीवर आहे. मराठा महासंघाने संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेसह मराठा आरक्षणाचा विषय स्वागत कमानीवर रेखाटला आहे. शिवसेनेने भव्यदिव्य बाळ ठाकरेंचे चित्र कमानीच्या मध्यभागी  प्रदíशत केले असून हिंदू एकता आंदोलनाने चालू वर्षी लेकुरवाळ्या विठूरायाचे पंढरीच्या मंदिरासह चित्र आपल्या स्वागत कमानीवर प्रदíशत केले आहे. शिवाजी पुतळ्यानजिक शिवाजी तरुण मंडळाने गुरू गोविंद सिंग यांना आपल्या कमानीवर स्वर्णमंदिरासह स्थान दिले आहे. याशिवाय गांधी चौक, शनी मारुती मंदिर, स्टेशन रोड आदी ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
चालू वर्षीचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी तब्बल ११०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तनात करण्यात आले आहेत. राणा प्रताप चौक, नागोबा कट्टा, भोसले चौक आणि गणेश तलाव या ठिकाणी पोलिसांनी नियंत्रण मनोरे उभारले असून मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यातून पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षात थेट प्रक्षेपण होत असून त्याव्दारे हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे.
विसर्जन मिरवणुकीवेळी पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्यासह चार पोलीस उपअधीक्षक, १८ पोलीस निरीक्षक, ५० हून अधिक पोलीस उपनिरीक्षक तनात करण्यात आले आहेत. तसेच राज्य राखीव दल, गृहरक्षक दल यांच्यासह वज्र या अत्याधुनिक साधनासह सुसज्ज असणारे वाहन पोलीस ताफ्यात तनात करण्यात आले आहे. बॉम्ब शोध पथकाव्दारे वेळोवेळी तपासणी करण्यात येत असून शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग आजपासूनच वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गणेश विसर्जनासाठी गणेश तलाव आणि कृष्णा घाट या ठिकाणी महापालिकेने व्यवस्था केली आहे. मोठय़ा मूर्ती कृष्णा घाट येथे विसर्जति करण्यात येणार असून त्याठिकाणी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.