संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळाने अडचणीत सापडलेल्या लोकांना ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून मदत करावी, त्यांना स्वावलंबी बनवावे आणि त्याचा आत्मविश्वास वाढवावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी व्यक्त केले.
मंडळाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त दादर येथील वनमाळी सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध ज्योतिषी श्रीराम भट हे अध्यक्षस्थानी, तर मांडलेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भट यांनी भाषणात सांगितले की, जीवनाचे चिंतन करायला लावणारे ज्योतिष शास्त्र अभ्यासताना कुंडलीचे मानसशास्त्रही अभ्यासावे. कुंडलीतील लग्नस्थान आणि लग्नबिंदू अतिशय महत्त्वाचे असून केंद्रस्थाने ही विशेष महत्त्वाची आहेत. या वेळी भय यांच्या हस्ते संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.
संस्थेचे कार्यवाह रवींद्र धुरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी मंडळाच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.  संस्थेचे कार्यवाह विश्वस्त सुनील डोंगरे यांनी संस्थेच्या नवीन अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. संस्थेचे खजिनदार विठ्ठल पाटील यांनी आभारप्रदर्शन तर सोनल चितळे यांनी सूत्रसंचालन केले.