महानगरपालिकेच्या पारगमन कराच्या वसुलीसाठी अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे २६ कोटी १३ लाख ६० हजार रुपयांचा देकार आला आहे. दोन निविदांपैकी भिवंडी येथील जे. के. एन्टरप्रायजेसची ही निविदा सर्वाधिक रकमेची ठरली आहे.
दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर शुक्रवारी पारगमन करवसुलीच्या निविदा उघडण्यात आल्या. या कामासाठी दोन निविदा आल्या होत्या. या निविदांचा तुलनात्मक तक्ता मनपाच्या स्थायी समितीला सादर केला जातो. तेथे हा निर्णय घेतला जातो. मात्र मनपात सध्या स्थायी समितीच अस्तित्वात नसल्याने यापुढच्या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यानच्या काळात सध्याच्याच ठेकेदाराला पुन्हा तिस-यांदा मुदतवाढ द्यावी लागेल असे सांगण्यात येते.
राज्य सरकारने जकात कर बंद केला असला तरी महानगरपालिका क्षेत्रामध्ये पारगमन कराची वसुली सुरू  आहे. या कामाचा मागचा ठेका २१ कोटी १० लाख रुपयांना निश्चित करण्यात आला होता. जकात कर बंद झाल्यानंतर पारगमन करासाठी हीच रक्कम निश्चित करून जकातीच्याच ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते. या ठेकेदाराची एक वर्षांची मुदत संपल्याने या कामासाठी मनपाने नव्याने ई-निविदा मागवल्या होत्या. या कामासाठी यंदा २४ कोटी २१ लाख रुपयांची किमान देकार रक्कम निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यापेक्षा जवळपास दोन कोटी रुपये अधिक रकमेची निविदा दाखल झाल्याने मनपात समाधान व्यक्त होते.
पुणे, सोलापूर, औरंगाबाद, कल्याण, मनमाड, दौंड असे सहा राज्यमार्ग शहरातून म्हणजे मनपा क्षेत्रातून जातात. येथून ये-जा करणा-या मालवाहू वाहनांकडून पारगमन कर वसूल केला जातो. यातील मनमाड आणि सोलापूर या राज्यमार्गावरून दिल्ली-हैदराबाद वाहतूक होते, ती प्रामुख्याने मालवाहू वाहनांचीच असते. पुणे-औरंगाबाद मार्गावरही मालवाहू वाहतूक लक्षणीय आहे. मनमाड ते पुणे राज्यमार्गाला जोडणारा बाहय़वळण रस्ता अलीकडेच सुरू झाला. या मार्गाने प्रवास करणा-यांना आता शहरात यावे लागणार नाही. त्यामुळे पारगमन कराच्या देकार रकमेबाबत साशंकता व्यक्त होत होती, मात्र मनमाडकडून येणारी किंवा जाणारी मालवाहू वाहने मुख्यत्वे सोलापूर राज्यामार्गानेच ये-जा करतात. त्यामुळे पारगमन कराच्या निविदेवर या बाहय़वळण रस्त्याचा काहीच परिणाम झाला नाही.