कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्त भागासाठी ३०१ ट्रक चारा पाठविण्यात येणार आहे. चारा संकलनाचे काम प्रत्येक तालुक्यात गतीने सुरू आहे. दुष्काळ भागात मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पहिल्याच बैठकीत ३८ लाख रुपयांची देणगी दिली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी चाऱ्याचे ट्रक पाठविले जाणार आहेत.    
रामनवमी दिवशी मंत्री मुश्रीफ यांचा ५९ वा वाढदिवस आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला जाणार आहे. दुष्काळी भागातील चारा छावण्यांना मदत करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्य़ातून ३०१ ट्रक चारा पाठविण्याचा निर्णय वाढदिवस समितीने घेतला आहे. त्यातील सांगोला (सोलापूर), सांगली व सातारा जिल्ह्य़ासाठी प्रत्येकी ९० ट्रक तसेच मुश्रीफ पालकमंत्री असलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ासाठी २० ट्रक चारा पाठविला जाणार आहे. या चारही जिल्ह्य़ांचे पालकमंत्री, संपर्कमंत्री, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चारा छावणीमध्ये चारा पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे आमदार के. पी. म्हणाले.    
दुष्काळग्रस्तांसाठी अर्थसाहाय्य केले जाणार असून आत्तापर्यंत ३८ लाख रुपयांच्या निधीचे संकलन झाले आहे. नगरसेवक रवी इंगवले यांनी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिद्री, भोगावती, आजरा, हेमरस, शरद या साखर कारखान्यांनी चारा वाहतुकीसाठी १५० ट्रक उपलब्ध करून दिले आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, नगरसेवक प्रा.जयंत पाटील, वाढदिवस समितीचे सचिव भैया माने उपस्थित होते.