कडेकोट बंदोबस्त आणि गेल्यावर्षी पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईची भीती यामुळे तरुणाईने मंगळवारी रात्री घरीच राहणे पसंत केल्याने यावर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री राबवलेल्या ‘ड्रंकन ड्राईव्ह’मध्ये केवळ ३४० मद्यपी अडकले. मावळत्या वर्षांची त्यांची अखेरची रात्र पोलीस ठाण्यात गेली. मद्यप्राशन करून वाहने चालवू नका, अशी सक्तताकीद पोलिसांनी आधीच दिली होती. तरीही बेधुंद मद्यपींनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रस्त्यांवर मोठय़ा संख्येने तैनात पोलिसांनी त्यांना गजाआड केले.
मावळत्या वर्षांला निरोप तसेच नव्या वर्षांच्या स्वागताप्रसंगी तरुणाई बेधुंद होत रस्त्यावर उतरते. आनंदातिरेकाने मद्यधुंद तरुणाई बेफाम वाहने चालवित जल्लोष करते. त्याचा त्रास इतर नागरिकांना होतो. अपघात होतात. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांना रात्र जागवावी लागली. काल मंगळवारी सायंकाळपासून वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, गांधीनगर, अंबाझरी, फुटाळा, सीताबर्डी, महाल, सदर, वर्धमाननगर, उमरेड रोडसह शहराच्या विविध ठिकाणी एकूण पाच हजारांवर पोलीस तैनात करण्यात आले. याशिवाय पोलिसांची पथके पहाटेपर्यंत गस्त घालत होती. पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, सहपोलीस आयुक्त संजयकुमार सक्सेना यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी स्वत: शहरात फेरफटका मारत होते. शहरातील विविध रस्त्यावर लोखंडी कठडे लावण्यात आले. तेथेही पोलीस तैनात होते. शहरातील सर्व उड्डाण पूल रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.
महिला वा तरुणींची छेडखानी करणाऱ्या गुंडाना चोप देण्यासाठी खास पथके शहरात फिरत होती. अंबाझरी, फुटाळा तलाव तसेच शहरातील विविध उद्यानांमध्ये पोलीस तैनात होते. हॉटेल्समध्येही साध्या वेषातील पोलीस तैनात होते. शंकरनगर चौक ते जीएस कॉलेज दरम्यान रस्ता सायंकाळनंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. रस्त्यावरील दृष्य काल काही वेगळेच होते. रस्त्यावर फारतर काही मोजकी वाहने जात होती. बारमध्ये एरवी असते तेवढीही गर्दी नव्हती. अगदीच शौकिन तेवढे रस्त्यावर होते. एवढा अपवाद वगळला तर रस्त्यावर पोलीसच जास्त दिसत होते. शहर पोलिसांजवळ मोजकेच ‘ब्रिथ अॅनलायझर’ आहेत. काल मध्यरात्री तीनवाजेपर्यंत ‘ड्रंकन ड्राईव्ह’मध्ये केवळ ३४० मद्यपी अडकले. त्या सर्वाना जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन त्यांचे वाहन जप्त करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वाविरुद्ध आज वा उद्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले जाणार आहे.
वाहतूक पोलिसांनी गेल्या आठवडाभरात मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या २२३ तर सोमवार सायंकाळ ते मंगळवार सायंकाळ दरम्यान २९३ वाहन चालकांवर कारवाई केली. इतर विविध वाहतूक कलमान्वये ६२३ वाहन चालकांवर कारवाई करून ७४ हजार ८०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. गेल्यावर्षी ३१ जानेवारीला पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या दोनशे वाहन चालकांवर नोटीस बजावली होती. त्यापैकी काही वाहन चालकांच्या पालकांना वाहतूक कार्यालयात बोलावले होते. त्यांच्यासमक्ष त्यांची मुले मद्यप्राशन करून वाहन चालविणार नाहीत यादृष्टीने समज देण्यात आली होती. ग्रामीण पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३० व ३१ डिसेंबरला ११ वाहन चालकांवर कारवाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2014 रोजी प्रकाशित
साडेतीनशे मद्यपींची रात्र पोलीस ठाण्यात
कडेकोट बंदोबस्त आणि गेल्यावर्षी पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईची भीती यामुळे तरुणाईने मंगळवारी रात्री घरीच राहणे पसंत केल्याने यावर्षी

First published on: 02-01-2014 at 09:55 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 350 drunkards to stay in police station on new year eve