अखिल भारतीय कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नागपुरातील २१ नोव्हेंबरच्या नियोजित सभेला गर्दी करण्यासाठी म्हणून ग्रामीण व शहरी भागातून लोक आणण्यासाठी ३५०० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्य़ाला ३५० ते ३०० बसेस देण्यात येणार असून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, संबंधित जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व जिल्हाध्यक्षांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते २१ नोव्हेंबरला नागपुरात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यानंतर कस्तुरचंद पार्कवर सोनिया गांधी यांची भव्य जाहीरसभा होणार आहे. या सभेला विदर्भातील अकराही जिल्ह्य़ातील कॉंग्रेसचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत सदस्य, नगरसेवक, तसेच जिल्हाध्यक्ष, महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, सेवादल, विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्ते हजर राहणार आहे. त्यादृष्टीने प्रदेश कॉंग्रेस समितीने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. या सभेला बहुसंख्य लोकांची गर्दी व्हावी म्हणून शहरी व ग्रामीण भागातून सभेसाठी येणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्ते व कॉंग्रेसप्रेमींसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हा, तालुका व गाव पातळीवरून या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विदर्भातील अकरा जिल्ह्य़ांसाठी किमान ३५०० बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहेत. त्यातील निम्म्या बसेस अमरावती विभागासाठी, तर अध्र्या बसेस  नागपूर विभागासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. जेथे कॉंग्रेसचा पालकमंत्री आहे तेथे बसेसची व्यवस्था पालकमंत्र्यांवर सोपविण्यात आलेली आहे, तर काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष व खासदार आमदारांनाही जबाबदारी देण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातून ३५० बसेस सुटणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्र्यांवर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली, तसेच पूर्व विदर्भातील गडचिरोलीसाठी, भंडारा, गोंदिया व वर्धा या चार जिल्ह्य़ांसाठी प्रत्येकी ३५०, तसेच अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा या पाच जिल्ह्य़ांसाठीही प्रत्येकी ३५० बसेस देण्यात आलेल्या आहेत. या सर्व बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राहणार आहेत. यासोबतच खासगी बसेस व टाटा सुमो, टवेरा व इतर चार चाकी गाडय़ांचीहीव्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व गावाच्या अध्यक्षांना शंभर व्यक्तींपासून, तर दीड ते दोन हजार कार्यकर्ते आणण्याचे टार्गेटही देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासोबतच रेल्वे व इतर माध्यमातूनही लोक नागपूरला पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोनिया गांधी यांची नागपुरातील सभा ही ऐतिहासिक व्हावी त्या दृष्टीने सर्वानी प्रयत्न करावे, अशा सूचनाही प्रदेशाध्यक्षांनी पालकमंत्री व जिल्हाध्यक्षांना दिलेल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात विचारणा केली असता ३५० बसेसची व्यवस्था ठेवण्यासंदर्भात तोंडी निर्देश मिळाल्याची माहिती देण्यात आली. येत्या एक ते दोन दिवसात संपूर्ण कार्यक्रम मिळणार असून त्यानुसार कोणत्या गावात किती बसेस जाणार आहेत हे कळेल, असेही सूत्रांनी सांगितले. सध्यातरी बसेसची जुळवाजुळव सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच खासगी ट्रॅव्हल्स व अन्य वाहनांची व्यवस्थाही केली जात आहे.