शिर्डी येथे साजरा झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सावात जवळपास चार लाखांहून अधिक भाविकांनी साई दरबारात हजेरी लावली. साईभक्तांनी या तीन दिवसांत तब्बल ४ कोटी ९३ लाखांची गुरुदक्षिणा साईचरणी अर्पण केली. यात २२ देशांतील परकीय चलनांचाही समावेश आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या काळात भाविकांनी साईचरणी अर्पण केलेल्या दानाची बुधवारी मोजमाप करण्यात आली. यात २ कोटी ६७ लाख ९४ हजार रुपयांचे सोने, चांदी, रोख रक्कम जगभरातील २२ देशांतील विदेशी चलनासह रोख ८ लाख रुपये दानपेटीत जमा झाले. दान मिळालेल्या चांदीचे मूल्य साडेतीन लाखांची ९ किलो चांदी, तर २६ लाख ६० हजार रुपयांचे १ किलो २४० ग्रॅम सोने आहे. साई संस्थानच्या विविध देणगी काऊंटरवर ७१ लाख १५ हजार रुपये तर प्रसाद अन्नदान २५ लाख ६३ हजार रुपये इतके दान जमा झाले.
गुरुपौर्णिमा उत्सवातील दक्षिणा जमा होण्याचा हा सर्वात मोठा आकडा असून, या अगोदर कधीही एवढी रक्कम दान पेटीत जमा झालेली नाही. उत्सव काळात संस्थानच्या प्रसादालयात भाविकांच्या देणगीतून मोफत भोजन प्रसाद देण्यात आले. तीन दिवसांत जवळपास १ लाख ८२ हजार भाविकांनी प्रसाद भोजनाचा तर ३० हजार भाविकांना नाश्ता पाकिटांचा लाभ घेतला. शिवाय अडीच लाखांवर लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली.
या वर्षीही पायी भाविकांची वारी श्रद्धा आणि सबुरीची परीक्षा पाहणारी ठरली. शिर्डी-नाशिक हा गुजरात आणि मुंबईच्या भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे. त्याला समांतर असताना येवला-नाशिक रस्ता चौपदरी झाला. मात्र शिर्डी-नाशिक रस्ता अद्यापही रेंगाळलेला आहे. कोल्हार ते कोपरगाव हा सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा रस्ता दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा राजमार्ग. सध्या या महामार्गाची मोठय़ा प्रमाणात दुर्दशा झाली असून, या रस्त्याच्या कामाला कधी मुहूर्त लागणार असा प्रश्न भक्त करीत आहे. साईबाबा संस्थानकडे मोठय़ा प्रमाणात दान जमा होत आहे. परंतु शिर्डी शहरातील आरोग्याचा प्रश्न तसेच शिर्डीला जोडणा-या प्रलंबित रस्त्यांची कामे तसेच विविध समस्या कधी सुटणार हा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याने भाविकांना अनेक अडचणींना तोंड द्यवे लागते. तरी ते मोठय़ा संख्येने शिर्डी येथे येतात. सबुरी ठेवून मोठय़ा श्रद्धेने दर्शन घेऊन जातात.
शिर्डी नगर पंचायत व साईबाबा संस्थान भक्तांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याबाबत कमी पडत आहे. तसेच शिर्डीतील वाढती गुन्हेगारी या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या प्रश्नाकडेही गृह विभागाचे लक्ष नसल्याने त्याचा त्रास भक्तांबरोबरच नागरिकांनाही होत आहे. शिर्डी बाह्य़वळण रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने शिर्डीतील वाहतुकीच्या कोंडीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे.