अकोल्यात क्षयरोगाचे ४५० रुग्ण असून अतिक्षयाचे १६ रुग्ण आहेत. या रुग्णांना रोगनिवारक औषध देण्यासाठी  सामाजिक क्षेत्रातील, तसेच अंगणवाडी सेवकांना वा समाजसेवकांना मनपातर्फे मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात येते, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.फारूख शेख यांनी दिली आहे, तर शेख यांनी औषध न देणाऱ्या व्यक्तीस उत्कृष्ट काम केल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप नगरसेवक योगेश गोतमारे यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करून फरूख शेख यांना बडतर्फ करण्यात यावे अशीही मागणी केली आहे.
डॉ.फारूख शेख यांनी २०१०-११ मध्ये शहर क्षयरोग कार्यालयाअंतर्गत मनपा कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजेच क्षयरोग्यास औषधी देणाऱ्या (डॉट प्रोव्हायडर) १२० डॉक्टरांना मानधन व प्रमाणपत्र दिले. यात नावेद अन्सारी मसूद अन्सारी या व्यक्तीचे या औषध देणाऱ्यांच्या यादीत नाव नसतांनाही त्यास उत्कृष्ट काम केल्याचे प्रमाणपत्र दिले, असा आरोप भाजपा नगरसेवक योगेश गोतमारे यांनी केला असून या प्रकरणी मनपा आयुक्तांनी चौकशी करावी व यात डॉ.फारूख शेख दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे.
शेख यांना या प्रकरणी विचारणा केली असता ते म्हणाले, शहरातील जे क्षयरोगी असतात त्यांना रोगनिवारक व प्रतिबंधक, अशी औषध देणाऱ्या किंवा त्या रुग्णांना ही औषधे देण्याची जबाबदारी स्वीकारून औषधे देतात त्या कोणत्याही व्यक्तीला औषधे देणारा, असे म्हटले जाते. औषध देणाऱ्याने रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत औषध देण्याचे काम करावे लागते. असे काम करणाऱ्यांमध्ये अंगणवाडी सेवक, समाजसेवक, तसेच क्षयरुग्ण शोधून काढणारे लोकसेवक या सर्वाची एक यादी तयार केली जाते व या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यास मनपा मानधन व प्रमाणपत्र देते. जे खरोखर हे कार्य तडीस नेतात त्यांनाच मानधन देण्यात येते, असे सांगून शेख म्हणाले, प्रमाणपत्र देण्यात आलेल्या कोणत्या नावेद अन्सारीला आपण ओळखतही नाही. त्यास प्रमाणपत्र दिले गेले असू शकते, पण मानधन मात्र दिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. शहरात क्षयरोगाचे जवळपास ४५० रुग्ण असून अतिक्षयाचे १६ रुग्ण आहेत. अतिक्षयाच्या रुग्णांवर साध्या औषधाचा कोणताही परिणाम होत नाही म्हणून सरकार त्यांच्यासाठी वेगळे औषध पुरविते व हे औषध त्यांना किमान १८ महिने सातत्याने घ्यावे लागते. या औषधाचा महिन्याचा प्रत्येक रुग्णावर होणारा खर्च २ लाख रुपये आहे, अशी माहिती डॉ. फारूख शेख यांनी दिली. मनपातील काही कर्मचारी नगरसेवकांना खोटी माहिती पुरवून भडकवतात व नगरसेवकही पुरेशी माहिती न घेता आरोप करतात, असे मनपातील सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 450 tuberculosis patients in akola
First published on: 12-11-2013 at 08:24 IST