उरण तालुक्यात सोमवारपासूनच पावसाचे पुनरागमन झालेले आहे. गेल्या २४ तासांत अविरत संततधार सुरू असून ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती उरणमधील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आलेली आहे. पावसाच्या आगमनामुळे पावसाअभावी थांबलेली शेतीची कामे पुन्हा एकदा सुरू झालेली आहेत. उरण पूर्व विभागातील शेतकऱ्यांनी त्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. दुसरीकडे उरण शहरातील नाले सफाई पूर्ण न झाल्याने कालच्या पावसानंतर उरण शहरातील गटारातील घाण रस्त्यावरून वाहत होती.
उरण तालुक्यातील पावसाच्या संततधारीमुळे जनजीवनावर परिणाम झाला असला तरी पावसाची गरज लक्षात घेऊन जनतेने पावसाचे उत्साहात स्वागत केलेले आहे. जून महिनाभर पावसा अभावी उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तरुणाईने पावसात चिंब होण्याचा आनंद लुटला. लहानग्यांनाही शाळेला जात असताना पावसाचा आनंद घेण्याची संधी मिळाली.