नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (निमा)वतीने पोलिसांच्या मदतीसाठी लवकरच ५० बॅरिकेट्स देण्याचे मान्य करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी यासंदर्भात उद्योगांना आवाहन केले होते. पोलीस व उद्योजकांमध्ये समन्वय राखण्याकरिता वारंवार बैठका घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
सातपूर व अंबड औद्योगिक क्षेत्रात दिवाळीपूर्वी पोलीस, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, सुरक्षारक्षक, ठेकेदार, महावितरण कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. दिवाळीच्या सुटीत औद्योगिक क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांबाबत सरंगल यांनी मार्गदर्शन केले होते. त्यानुसार उद्योजकांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाल्याने औद्योगिक क्षेत्रात कुठल्याही स्वरुपाची अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे निमातर्फे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या हस्ते  सरंगल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त संदीप दिवाण, उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, निमाचे उपाध्यक्ष के. एल. राठी आदी उपस्थित होते.

भविष्यातही औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्न व अडचणींबाबत समन्वयाने बैठक आयोजित करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
बेळे यांनी दिवाळीपूर्वी अशा स्वरुपाची बैठक घेतल्यामुळे कुठल्याही स्वरुपाची अनूचित घटना चोख पोलीस सुरक्षा व्यवस्थेमुळे घडली नसल्याचे सांगितले.
सातपूर व अंबड औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक नियोजन व रस्त्यांवर उभे राहणारे ट्रक व कंटेनरची समस्या दूर करण्यासाठी नाशिक महानगरपालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना शहराच्या प्रवेशव्दाराजवळ ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी केली असून त्याबाबत जिल्हा उद्योग केंद्राच्या बैठकीतही चर्चा झाल्याचे बेळे यांनी सांगितले.