राहुरी तालुक्यातील मुळा धरणाने शुक्रवारी दुपारी १४ हजार दशलक्ष घनफुटांचा टप्पा पार केला. जुलै संपण्यापूर्वीच धरण सुमारे ५४ टक्के भरल्याने लाभधारक शेतक-यांमध्ये उत्साह संचारला आहे. दुपारी १२ वाजता धरणाच्या कार्यक्षेत्रात १३ हजार ३७५ क्युसेकने नवीन पाण्याची आवक चालू होती. यंदाच्या पावसाने अनेकांच्या सन २००६ च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.   
नगर शहरासह राहुरी, नेवासे, शेवगाव, पाथर्डी या  तालुक्यांना प्रामुख्याने धरणाचा लाभ होतो. या सर्वांचेच लक्ष धरणाच्या पाण्याकडे लागले आहे. मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाचे सातत्य कायम असल्याने धरणातील पाणीसाठय़ात वाढ होत आहे. हरिश्चंद्रगड भागात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे.
सन २००६ सालच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. २००६ साली मुळा धरण ओव्हरफ्लो झाले होते. याच काळात धरणात पाण्याची मोठी आवक होऊन दि. २३ जुलैला धरण निम्मे भरले होते. यंदा ते दि. २४ जुलैला धरण निम्म्यावर आले. त्या वेळी २३ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान विक्रमी पावसाने ५ ऑगस्टलाच धरण तुडुंब भरले होते. दि. ६ ऑगस्टला मुळा नदीपात्रातून तब्बल ४५ हजार क्युसेकने जायकवाडीकडे विसर्ग सोडण्यात आला होता. यंदाही मोठय़ा पावसाची शक्यता व्यक्त होत आहे.