जिल्ह्य़ातील सात नगरपालिकांच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत यवतमाळ, आर्णी, उमरखेड, दिग्रस, घाटंजी व पुसद या सहा नगर पालिकेत सर्व सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. वणी नगर परिषदेत विरोधात असलेल्या मनसेने मात्र सभापतीपदे काबीज केली.
जिल्हय़ातील आर्णी, यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, घाटंजी आणि वणी या नगर पालिकांच्या निवडणुका डिसेंबर २०११ मध्ये पार पडल्या. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व विषय समित्याच्या सभापतींची निवड करण्यात आली. सभापतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सर्व नगरपालिकेत विशेष सभा घेऊन बुधवारी नवे सभापती निवडण्यात आले. यवतमाळ पालिकेत बांधकाम सभापती म्हणून पंकज मेश्राम (बीएसपी), शिक्षण सभापतीपदासाठी साधना काळे, आरोग्य सभापती मुन्ना उर्फ मनिष दुबे, नियोजन मंदा डेरे, महिला बालकल्याण सुचिता पटले हे बिनविरोध निवडून आले. स्थायी समितीची घोषणाही या बठकीत करण्यात आली. यात नगराध्यक्ष योगेश गढीया, उपाध्यक्ष जगदीश वाधवाणी, बाळासाहेब चौधरी, सुमित बाजोरीया, जयदीप सानप, यांची निवड करण्यात आली. पुसद नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड काल दुपारी झालेल्या विषय समितीच्या बठकीत करण्यात आली. बांधकाम सभापती म्हणून डॉ.उमाकांत पापीनवार, तर पाणीपुरवठा सभापती राजीव दुधे यांची फेरनिवड करण्यात आली. पुसद नगर पालिकेत राष्ट्रवादी व शिवसेनेची युती आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वाटेला दोन सभापतीपद देण्यात आले. यात दोन्ही सभापतीपदी फेरनिवड करण्यात आली. आरोग्य सभापती म्हणून वर्षां दरणे, शिक्षण सभापती नामदेव फाटे, महिला व बालकल्याण सभापती माला बिडकर, नियोजन सभापती डॉ. अकिल मेनन यांची निवड करण्यात आली. दिग्रस न.प.मध्ये बांधकाम सभापती नुरमहमद खान, शिक्षण सभापती रामप्यारी उत्तम नरळे, आरोग्य सभापती जावेद पहेलवान, पाणी पुरवठा सभापती, रामूजी पवार, महिला व बालकल्याण सभापती मिनाक्षी मुळे उपाध्यक्ष व नियोजन सभापती डॉ.मुस्ताक प्यारमहमद यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी नियुक्ती जाहीर केली. घाटंजी पालिकेत परेश कारिया, चंद्ररेखा रामटेके, सीमा डंभारे, संगीता भूरे, अकबर तंवर, अर्चना गोडे यांची बिनविरोध निवड झाली. उमरखेड पालिकेत शैलेश मूंगे, नंदकिशोर अग्रवाल, भारत खंदारे, पुष्पा चव्हाण, बालाजी देशमुख बिनविरोध निवडल्या गेले. आर्णीत भागचंद लोया, जापेद सोळंकी, अनिता भगत, ज्योती मोरकर, गौसिया शहा हे पूर्वीचेच सभापती कायम ठेवण्यात आले आहेत. वणी पालिकेत मनसे विरोघी पक्षात असूनही सभापतीपदाच्या निवडणुकीत या पक्षाने बाजी मारली. अशोक बुरडकर, अ‍ॅॅड. ईकबाल, राजू डफ, विनोद नीमकर, अभिजित सातोकर, पुष्पा कुलसंगे, मीरा मोहीतकर निवडून आले.