धोम धरणातून ६ हजार ४०० क्युसेक पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडले आहे. त्यामुळे वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी घुसले. संकष्टी चतुर्थी असूनही मंदिर भाविकांसाठी आज बंद ठेवण्यात आले.
बलकवडी धोम, महाबळेश्वर जांभळी खोऱ्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक राहिल्याने धोम धरणातून सकाळी नऊच्या दरम्यान ६४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. कृष्णा नदीच्या पात्रातील पाणीपातळी वाढल्याने वाईला पुराचे स्वरूप आले होते. महागणपती पूल व मंदिराला पाणी लागले होते. चतुर्थी असूनही गणपती दर्शन न झाल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. वाई, भुईंज, खंडाळा, फलटण येथे आज पावसाने विसावा घेतला. अनेक दिवसांनंतर या भागात सूर्यदर्शन झाले.