पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या संशयित प्रवाशांनी बडनेरा रेल्वे स्थानकानजिक गाडीची साखळी ओढून चार बॅग खाली टाकल्या. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांनी त्या लोकांना हटकल्यावर ते पसार झाले. त्यानंतर या चार बॅग्ज रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यात ७० किलो गांजा सापडला.
 या अमली पदार्थांची बाजारपेठेतील किंमत साडेतीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील एस-२ या बोगीत या चार बेवारस बॅग्ज असल्याची माहिती रेल्वे विभागाने अकोला रेल्वे पोलिसांना दिली. माहिती मिळताच फलाट क्र.१ वर पोलिसांनी या बॅग्ज ताब्यात घेतल्या व अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे प्रवासी या बॅग्ज घेऊन उतरत होते त्यांचा पंकज जायले यांना संशय आल्यावर त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने या लोकांचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.