जिल्ह्यातील निफाड आणि सिन्नर तालुक्यात झालेल्या गारपिटीत अनुक्रमे ४६३८ व ६६९ अशा एकूण ५,३०७ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, गहू, कांदा व हरभरा पिकांना तडाखा बसल्याचे प्राथमिक नुकसान अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यात पुन्हा कोटय़वधींचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे. गारपिटीचा ७५७४ शेतकऱ्यांना फटका बसला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्ष दंग झाले असताना अस्मानी संकटाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले आहे.
हिवाळ्याचा हंगाम निरोप घेण्याच्या मार्गावर असताना नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी त्यात गारपिटीने भर टाकली. निफाड तालुक्यातील सायखेडा, तामसवाडी, तारुलखेडले, नांदुरमध्यमेश्वर, म्हाळसाकोरे, खाणगाव तसेच नाशिक तालुक्याच्या पूर्व भागास पाऊस व गारपिटीचा सामना करावा लागला. सिन्नर तालुक्यातीस ठाणगाव, पाडळी, सोनांबे भागात गारपीट झाली. पावसात एका शेतकऱ्याचाही मृत्यू झाला. शिंदेवाडी येथील निवृत्ती आबाजी हांडोरे (६०) असे त्यांचे नांव आहे. निफाड व सिन्नर तालुक्यात गारपिटीने द्राक्ष, डाळिंब, हरभरा, गहू व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी द्राक्षबागा व हाताशी आलेला गहू भुईसपाट झाला. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कोसळणाऱ्या संकटाने शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असताना गारपीट व अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. गारपिटीनंतर कृषी विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले. प्राथमिक अंदाजानुसार निफाड तालुक्यात ४६३८ हेक्टर तर सिन्नर तालुक्यातील ६६९ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती कृषी अधिकारी एम. एस. पन्हाळे यांनी दिली. या दोन तालुक्यातील ७५७४ शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. नुकसानीचा हा आकडा कोटय़वधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. गतवेळच्या अवकाळी पावसात जिल्ह्यातील ११ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.
अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असले तरी निवडणुकीच्या धामधुमीत मश्गुल असणाऱ्या राजकीय पक्षांचे या प्रश्नाकडे लक्ष गेलेले नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे नुकसानग्रस्तांना काही मदत मिळेल की नाही याबद्दल शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.