शाळेत पहिल्याच दिवशी गैरहजर राहिलेल्या व उशिरा आलेल्या शिक्षकांची एक वर्षांची वेतनवाढ थांबविण्यात येणार असल्याचे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी स्पष्ट केले. नन्नावरे यांनी स्वत: निलंगा पंचायत समितीत जाऊन दांडीबहाद्दर ८० शिक्षकांचे रेकॉर्ड तपासले. या वेळी चांगले रेकॉर्ड असलेल्या शिक्षकांना मात्र यातून सवलत मिळणार असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.
निलंगा तालुक्यात २४ शाळांतील ७८ शिक्षक, तर औसा तालुक्यात दोन शाळांमध्ये दोन शिक्षक शाळेच्या पहिल्याच दिवशी कर्तव्यात कसूर करताना आढळून आले. या ८० शिक्षकांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. निलंगा पंचायत समिती बीडीओ कार्यालयात या शिक्षकांचे रेकॉर्ड तपासण्यात आले. शाळेत स्वच्छता का केली नाही? या व अन्य प्रश्नांचा ‘सीईओं’ नी या वेळी भडीमार केला.
सर्वच शिक्षकांनी माफीनामा लिहून दिला. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना या कारवाईतून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘सीईओं’ नी औसा तालुक्यातील लामजना पाटी, निलंगा तालुक्यातील अशोकनगर, िलबाळा, भूतमुगळी, हासोरी बु., दादगी, हरीजवळगा, कासारशिरसी, शिराढोण, नेलवाड, हल्लाळी, सरदारवाडी, बालकुंदा, औराद शहाजनी, ताडमुगळी, शिरसी हंगरगा, शेळगी, आंबुलगा या शाळांना भेटी दिल्या. सरकारच्या सूचनेनुसार प्रभातफेऱ्या, शाळेला तोरण, विद्यार्थ्यांचे स्वागत या बाबत पाहणी केली. एखाद-दुसऱ्या शाळेचा अपवाद वगळता अन्य शाळांमध्ये त्रुटी आढळून आल्या. तेथील शिक्षकांना धारेवर धरण्यात आले.