कराड तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सभेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ५६९ तर श्रावणबाळ सेवा योजनेच्या ३०६ अशा एकूण ८७५ अर्जाना मंजुरी देण्यात आली.
कराड तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस सचिव तथा तहसीलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी आदर्श अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल बी. एम. गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या योजनेतून प्रतिमाह अज्ञान मुले असणाऱ्या अर्जदारांना ९०० रुपये आणि मुले नसणाऱ्या अर्जदारांना ६०० रुपये अनुदान मिळते. तर श्रावणबाळ सेवा योजनेतून प्रतिमाह ६०० रुपये अनुदान मिळते. येथे झालेल्या समितीच्या सभेत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ५६९ तर श्रावणबाळ सेवा योजनेंतर्गत ३०६ अशा एकूण ८७५ अर्जाना मंजुरी देण्यात आली. कराड तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून एकूण ३६०१ लाभार्थीना अनुदान मिळणार आहे तर श्रावणबाळ सेवा योजनेतून एकूण २३५३ लाभार्थीना अनुदान मिळणार आहे. योजना समिती सभेच्या कामकाजावेळी महसूल कर्मचारी एन. डी. चोपडे, व्ही. व्ही. शेवाळे, श्रीमती एस. ए. खबाले-पाटील, एस.टी. बंडगर यांनी परिश्रम घेतले. संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना आदी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना कार्यालयात आवश्यक ते मार्गदर्शन संबंधित लाभार्थीना दिले जात आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सभेच्या मंजुरीने लाभार्थीना त्याचा लाभ मिळवून दिला जात आहे.