जायकवाडीत पाणी सोडण्यास वरच्या भागातून होणारा विरोध चुकीचा व मराठवाडय़ावर अन्याय करणारा आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री तथा जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी केला. नऊ टीएमसी पाणी पुरेसे ठरणार नाही. कारण सोडलेले ९ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचणार नाही आणि आलेल्या पाण्याने मराठवाडय़ातील प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जायकवाडीसारखा मोठा प्रकल्प उभारल्यानंतर त्यात दरवर्षी किमान पाणीसाठा झाला पाहिजे. नाहीतर अशा प्रकल्पांना अर्थच उरणार नाही. एकाच नदीखोऱ्यात अनेक धरणे असतील व त्यातील सर्वात खालचे धरण पाण्याशिवाय राहात असेल तर या संदर्भात राज्य सरकारने विचार केला पाहिजे, असेही खोतकर म्हणाले.
ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ात वरच्या धरणातून पाणी सोडल्यामुळे जायकवाडीतील उपयुक्त साठा तीन टीएमसीपर्यंत पोहोचला. सध्या उपयुक्त साठा अडीच टीएमसीपेक्षा कमी आहे. नगर व नाशिक जिल्हय़ांतील धरणांमध्ये सध्या जवळपास ५५ टीएमसी पाणी असून, याशिवाय जवळपास १२ टीएमसी पाणी त्या भागात खरिपास ऐन पावसाळय़ात वळविण्यात आले. एकाच नदीखोऱ्यातील सर्व धरणांचा साठा सारखा राहावा, यासाठी ऑक्टोबरमध्ये नियमन करावे, असे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात स्पष्ट केले आहे. तसेच तुटीच्या वर्षांत खालच्या धरणाखालील शेतकऱ्यांना किमान एक एकर जमीन भिजेल एवढे पाणी द्यावे, असा नियम आहे. नियमांचाच विचार केला तर सध्या जायकवाडीत २८ ते ३० टीएमसी पाणीसाठा असणे आवश्यक आहे.
जायकवाडीच्या वरील भागात ११५ टीएमसी पाणीसाठा मंजूर असतानाही प्रत्यक्षात १७३ टीएमसी पाणीसाठा व वापर करण्यात येतो. वरच्या भागात मंजूर क्षमतेपेक्षा अधिक धरणे मंजूर केल्याचा परिणाम म्हणून जायकवाडीत दरवर्षी क्षमतेएवढा व मंजूर असलेला १०२ टीएमसी पाणीसाठा होत नाही. अहमदनगर जिल्हय़ातील ५ व नाशिक जिल्हय़ातील १५ धरणांमुळे जायकवाडीत पाणी येत नाही. वरच्या भागातील धरणांमुळे जायकवाडीच्या निर्मितीला अर्थ राहिला नाही. जवळपास २२ हजार चौरस किलोमीटर पाणी येत असेल, तर याबाबत सरकारदरबारी गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येक पावसाळय़ात जायकवाडीत ५० टक्के उपयुक्त साठा झाल्यावरच वरच्या धरणांमध्ये पाणी अडविले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात तसे होत तर नाहीच, उलट वरची धरणे भरल्यावरही त्याच भागातील अन्य साठे भरण्यासाठी हे पाणी वळविले जाते. ऐन पावसाळय़ातही कालव्यांद्वारे पाणी त्याच भागात वळविण्यात येते. सध्या जायकवाडीत जो मृत जलसाठा आहे तो सांगितला जातो, तेवढा नाही. जायकवाडीतील मृत जलसाठा ७३८ दशलक्ष घनमीटर असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात तो ३८० दशलक्ष घनमीटरच्या आसपास असण्याची शक्यता आहे. कारण या प्रकल्पात मोठय़ा प्रमाणावर गाळ आहे.
नगर व नाशिक जिल्हय़ांतून जायकवाडीत पाणी सोडण्यास होणारा विरोध अन्याय आहे. जायकवाडी धरणाची निर्मिती झाल्यावर कुठलाही धरबंध न ठेवता वरच्या भागात धरणे बांधण्यात आली. एकाच नदीखोऱ्यातील धरणाच्या संदर्भातील महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन वरच्या भागात होत असून ते मराठवाडय़ावर अन्याय करणारे असल्याचेही खोतकर यांनी म्हटले आहे.    
२२ टीएमसी पाणी सोडा- टोपे
जायकवाडीत कमीत कमी २२ टीएमसी पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडय़ातील ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांनी केली. ९ टीएमसी पाण्याने मराठवाडय़ाचा प्रश्न सुटणार नाही. पाण्यासंदर्भात मराठवाडय़ावर वरच्या भागांतून अन्याय होत असल्याचेही पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच राज्यकर्ते सिंचनासह सर्व बाबतींत अन्याय करतात. पश्चिम महाराष्ट्रासह विकासासंदर्भात जे काही मिळते त्याच्या तोडीस तोड मराठवाडय़ास मात्र मिळत नाही. विकासासंदर्भात अन्याय होत असला, तरी त्यावर स्वतंत्र मराठवाडय़ाची मागणी करणे मात्र अव्यवहार्य आहे. मराठवाडा स्वतंत्र केला तर एवढे राज्य कोणत्याही बाबतीत सक्षम ठरणार नाही. पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाडय़ावर अन्याय होत असल्याने आपण त्याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे आणि मराठवाडय़ाच्या न्याय्य हक्कासाठी मागण्या केल्या पाहिजेत. महाराष्ट्रात राहूनच विकासासाठी आग्रह धरला पाहिजे, असेही ते म्हणाले.