इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून ज्यांचा गौरव आणि उल्लेख केला जातो ते वा. सी. बेंद्रे यांचे दुर्मिळ झालेले साहित्य पुन्हा वाचकांना उपलब्ध झाले आहे. ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘शिवराज्याभिषेक प्रयोग’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराज’ अशी त्यांची पुस्तके ‘पाश्र्व’ पब्लिकेशनने पुनप्र्रकाशित केली आहेत.
महाराष्ट्राला इतिहास संशोधकांच्या परंपरेतील वा. सी. तथा वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक इतिहास ग्रंथसंपदा निर्माण केली. वयाच्या ८० व्या वर्षी ‘राजाराम महाराज चरित्र’ प्रकाशित करून कामावरील निष्ठा व्यक्त करणारे बेंद्रे हे वेगळेच विद्वान होते. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रेंचा मोठा वाटा आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांच्या या संशोधनातून प्रसिद्ध झालेली ग्रंथसंपदा गेली अनेक वर्षे दुर्मिळ झाली होती. अशा या ग्रंथमालेतील बेंद्रे यांनी लिहिलेले चार ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहेत. ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’,‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘शिवराज्याभिषेक प्रयोग’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराज’हे चार ग्रंथ पाश्र्व पब्लिकेशनने वाचकांना नव्याने उपलब्ध करून दिले आहेत. ते अनुक्रमे ५५०, १२००,५५० व २०० पानांचे आहेत. या ग्रंथांचे स्वामित्व हक्क बेंद्रे यांच्या अमेरिकास्थित मुलीकडे साधना बेंद्रे-डहाणूकर यांच्याकडे होते. त्यांनी ते पाश्र्व प्रकाशनकडे सोपविले आहे.
बेंद्रे यांच्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ या ग्रंथाने समाजात विलक्षण खळबळ उडवून दिली. सुमारे ४० वर्षे त्यांनी या विषयाचा धांडोळा घेतला. परदेशातही शोध घेऊन संभाजी महाराजांची चुकीची रंगवली जाणारी प्रतिमा त्यांनी बदलवून टाकली. पराक्रमी, धोरणी, मुत्सद्दी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारा राजा ही खरी प्रतिमा समाजासमोर आणली. १९६० साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथाने अभ्यासकांना पुनरअभ्यास करण्यास प्रवृत्त केले. साहित्य अकादमीने या ग्रंथास पुरस्कृत केले. बेंद्रे शिवशाहीच्या अंतरंगात प्रवेश करीत खोलवर गेले. मालोजी, शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम यांच्या संबंधीच्या संशोधनाने त्यांचा आवाका दिसून आला. बेंद्रे यांच्या इतिहास संशोधनाला एक आंतरिक संगती आहे.त्याचे दर्शन उपरोक्त चार ग्रंथांतून होते.
चार ग्रंथांचे नव्याने प्रकाशन करण्यात आले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शिवकालीन इतिहास ज्ञात करून घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतील वाचकांसह अमेरिका, इंग्लड आदी विदेशातूनही ग्रंथांची खरेदी होत आहे. हा प्रतिसाद पाहून येत्या सहा महिन्यात ५ हजार प्रती विकण्याचा संकल्प प्रकाशकांनी केला आहे. विशेष म्हणजे चारही ग्रंथांची किंमत २५०० रूपये असली तरी पहिल्या महिन्यात ती खरेदी करणाऱ्यांना अवघ्या १३०० रूपयांमध्ये उपलब्ध केली असल्याचे प्रकाशक राहुल मेहता (कोल्हापूर) यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलतांना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2013 रोजी प्रकाशित
इतिहासकार बेंद्रे यांची दुर्मिळ पुस्तके पुन्हा वाचकभेटीला
इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून ज्यांचा गौरव आणि उल्लेख केला जातो ते वा. सी. बेंद्रे यांचे दुर्मिळ झालेले साहित्य पुन्हा वाचकांना उपलब्ध झाले आहे. ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘शिवराज्याभिषेक प्रयोग’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराज’ अशी त्यांची पुस्तके ‘पाश्र्व’ पब्लिकेशनने पुनप्र्रकाशित केली आहेत.

First published on: 23-04-2013 at 03:26 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A historian bendres rarest books available for readers