आर्चडायसेस या रोमन कॅथलिक चर्चच्या शतसंवत्सरी वर्षांनिमित्त अध्यात्मिक उन्नती आणि नवचेतना जागविण्याच्या दृष्टीने येत्या २४ व २५ नोव्हेंबरला भरगच्च संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात येणाऱ्या समारोप कार्यक्रमाला राज्यपाल के. शंकरनारायण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी आर्चबिशप एस. पेन्नाचिओ राहणार असल्याची माहिती नागपूरचे आर्चबिशप व्ही. अब्राहम यांनी पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी ५ वाजता ४० तासांपासून अखंडपणे होणाऱ्या प्रार्थनेचा समारोप होईल. सायंकाळी सात वाजता मेणबत्ती प्रज्ज्वलित करून प्रभूचे गुणगान करण्यात येईल.
फादर फेरिया यांच्या कार्यकाळात अनेक वर्गातील लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. १८५३ मध्ये राजा भोसले यांनी राज्य स्थापन केले, त्यावेळी गोव्याच्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी नागपुरातील आर्चडायसेसचा कारभार पाहिला. नागपूर विभाग तत्कालीन मद्रास आर्चडायसेसच्या प्रमुखांच्या हाती होता. सन १८४२ मध्ये फादर ब्रिमन यांनी कामठीत चर्च बनवून नागपुरात एका छोटय़ा प्रार्थनालयाच्या बांधकामाला सुरुवात केली. फादर इमॅनुएल कामठीत भारतीय कॅथलिक समाजाच्यावतीने काम करीत होते. त्यावेळी कामठीत ४५० कॅथलिक आणि अन्य ख्रिस्त मिळून तीन हजार लोक होते. फादर लावोरने सीताबर्डी आणि पारडीत प्रार्थनालय बनविले.
बदलत्या काळानुसार अनेक मिशनरीज नागपुरात आले. जोजेफच्या अनुयायांनी १८५४ मध्ये कामठीत येऊन निवासी शाळा आणि अनाथालयांची स्थापना केली. डॉ. थियोफिलिस नेयर यांनी कामठीच्या चर्चला कुमारी माता मरियमच्या आदराप्रीत्यर्थ समर्पित केले. १८७० मध्ये एसएफएस स्कूल आणि संत जोजेफ कॉन्व्हेंटची स्थापना झाली. जबलपूर, पाषाण, पचमढी, विलासपूर, अमरावती, रायपूर, डोंगरघाट, खंडवा, बागमार, कामठी आणि औलिया इत्यादी हे सर्व आर्चडायसेस या रोम कॅथलिकच्या अधिपत्याखाली येतात. यावेळी फादर जोसेफ पॉलिशेटी, फादर जेरोम पिंटो, अ‍ॅड. कॅथलिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटर घाडगे, सचिव जोसेफ राव आणि सदस्य निल्सन फ्रान्सिस उपस्थित होते.