भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना करून परतलेल्या बहिणीसोबत तिचा पती व मुलीवर काळाने झडप घातली. भंडारा मार्गावरील महालगावजवळ गुरुवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. या घटनेने भंडारा मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास विस्कळीत झाली होती. मधुकर अबलंकर, त्यांची पत्नी उषा आणि मुलगी रिना अपघातामध्ये ठार झाले.
रामेश्वरीजवळील जयवंत नगरात राहणारे मधुकर अबलंकर हे दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षात कामाला होते. पत्नी उषा गृहिणी तर मुलगी रिना ही कमला नेहरू महाविद्यालयात विज्ञान शाखेची अकरावीची विद्यार्थिनी होती. उषा अबलंकर यांचे भाऊ दामोधर चौधरी मौदा येथे राहतात. भाऊबीजेला भावाला सुटी नसल्याने भावाला ओवळणे राहून गेले होते. बुधवारी सकाळी मधुकर, उषा आणि मुलगी रिना मोटारसायकलने मौद्याला गेले. उषा यांनी भावाला ओवाळून दीर्घायुष्याची कामना केली. गुरुवारी मधुकर अबलंकर यांना कामावर जायचे असल्यामुळे तिघेही मोटारसायकलने सकाळी नागपूरला येण्यासाठी निघाले. महालगाव परिसरात नागपूरहून भाजी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव मेटॅडोरने मोटारसायकलला जबरदस्त धडक दिली. त्यात तिघेही दूर फेकल्या गेले. भरधाव असलेला मेटॅडोरही उलटला. अपघातामध्ये तिघेही गंभीर जखमी झाल्यामुळे परिसरातील लोक जमा झाले. मौदा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दगडावर आदळल्याने मधुकर अबलंकर यांच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे ते घटनास्थळी ठार झाले. पत्नी उषा आणि मुलगी रिना गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तात्काळ मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान प्रथम रिना आणि त्यानंतर काही वेळातच उषाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अबलंकर कुटुंबातील सदस्यांनी मेयो रुग्णालयात धाव घेतली. जयवंत नगरात बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर लोकांनी अबलंकर यांच्या निवासस्थानासमोर गर्दी केली तर काहींनी मेयोमध्ये धाव घेतली. महालगाव परिसरात या घटनेने तणाव निर्माण झाला असून नागरिकांनी ‘रास्ता रोको’ केले. त्यामुळे या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लोकांची समजूत घालून मेटॅडोरचालकाला अटक केली.
मधुकर अबलंकर यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यापैकी रिना ही त्यांच्यासोबत गेली होती, मात्र मुलगा पवन आणि मुलगी राणी घरीच थांबले होते.
पवन हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तर राणीचे बी. एड. झाले आहे. आई, वडील आणि बहिणीच्या अपघाताच्या मृत्यूची माहिती मिळताच दोघांना जबर धक्का बसला. मेयोमध्ये जाताच दोघांनी हंबरडा फोडला. एकाचवेळी काळाने आई-वडील आणि बहिणीला कवेत घेतल्याने दोघांना काय करावे कळत नव्हते. तिघांच्या मृत्यूने रामेश्वरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
महालगावजवळ अपघातात पती, पत्नी व मुलगी ठार
भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना करून परतलेल्या बहिणीसोबत तिचा पती व मुलीवर काळाने झडप घातली. भंडारा मार्गावरील महालगावजवळ गुरुवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. या घटनेने भंडारा मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास विस्कळीत झाली होती. मधुकर अबलंकर, त्यांची पत्नी उषा आणि मुलगी रिना अपघातामध्ये ठार झाले.
First published on: 23-11-2012 at 12:43 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident in mahalvillage husbandwife and girl dead