शालेय विद्यार्थ्यांच्या वाढत्या अपघाताची नोंद घेऊन राज्य शासनाने काही नवीन कायदे सर्व शिक्षण संस्थांना पाळणे बंधनकारक करण्यात आले असून विनापरवाना वाहनाने विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिला. जिल्हा स्कूल बस समितीच्या सभेत ते बोलत होते. या सभेला जिल्ह्य़ातील विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन नियमांमध्ये नवीन सुधारणा करण्यात आल्याचे स्पष्ट केले. स्कूल बसचा वेग ताशी ५० कि.मी. पेक्षा जास्त असू नये, चालकाकडे पाच वर्षांचा जड वाहन चालवण्याचा परवाना असावा, मुलींच्या बसमध्ये सहाय्यक म्हणून महिलेची नियुक्ती करावी, यासाठी शालेय स्तरावर सभा घेऊन स्कूल बस समिती स्थापन करावी व विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्याचे शुल्क निश्चित करावे, बसचा मार्ग ठळक अक्षरात लिहून बसमध्ये प्रथमोपचार पेटी ठेवून त्याचा वापर कसा करावा, याबाबत चालक व सहाय्यकाला प्रशिक्षण दिलेले असावे, अशी माहिती त्यांनी दिली.
अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे म्हणाले, राज्य शासनाने ठरविलेल्या नियमावलीनुसार ज्या शिक्षण संस्था स्कूल बस चालवणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात दिरंगाई केली जाणार नाही. संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी याची जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची हमी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.
सभेला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, अधीक्षक खोब्रागडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश शेटे, जनसंपर्क अधिकारी धर्मेंद्र जोशी, मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपनिरीक्षक पांडव यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.