चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ या उपक्रमांतर्गत येत्या ४ डिसेंबर रोजी दादर पश्चिमेकडील दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात पोंक्षे यांच्याशी रसिकांना थेट संवाद साधता येणार आहे. कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
सई परांजपे यांची मुलाखत
चित्रपटाचे तंत्र समजून घेण्यासाठी रसिक आणि अभ्यासक म्हणून वेगवेगळे पैलू तपासणे आवश्यक आहे. असे निरिक्षण करत राहिले तर कलावंतांच्या वाढीसाठी पोषक अशा अनेक गोष्टी समजतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी दादर येथे केले. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या लेखिका संमेलनाच्या समारोपात मधुवंती सप्रे यांनी त्यांची प्रगट मुलाखत घेतली. त्या वेळी परांजपे बोलत होत्या.
चित्रपट, नाटक, लघुपट आणि मालिकांचे दिग्दर्शन, पटकथालेखन, बालकंगभूमी, आकाशवाणी आदी विविध क्षेत्रातील आपले अनुभवविश्व परांजपे यांनी या गप्पांमधून उलगडले. भारतीय पटकथांचे संकलन होणे आवश्यक असून व्यंकटेश माडगुळकर, विजय तेंडुलकर आदींच्या पटकथांचे संकलन झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आपल्याकडे चांगल्या पटकथा नाहीत, सेटवर चित्रिकरण सुरू असताना संवाद लिहिले जातात, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
विश्वकोशाचा १९ वा खंड प्रकाशित
मराठी विश्वकोशाच्या १९ व्या खंडाचे प्रकाशन नुकतेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात झाले. या वेळी मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रमोद नलावडे, मुंबई विद्यापीठाच्य माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, अभिनेत्री रिमा, निवेदिका मंगला खाडिलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हेमचंद्र प्रधान, ‘सीडॅक’चे सहसंचालक महेश कुलकर्णी, विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. गोविंद फडके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अपंगांसाठीच्या पर्यटन सुविधा
‘बियॉण्ड बॅरिअर्स- द इन्क्रिडेबल इंडिया टूर’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील कावसजी जहांगीर सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास महापौर सुनील प्रभू, डॉ. विलियम् टॉम, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. शंकर अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अरविंद प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली निशांत खाडे, सुनीता संचेती, नीनू केवलानी, यांनी ८४ दिवसात २८ राज्ये, ४० शहरातील १९ हजार किलोमीटरचा प्रवास करून भारतातील अपंगांविषयी पर्यटनविषयक सुविधा व सोयी यांची माहिती गोळा केली आहे. त्या माहितीचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व अॅक्सेस फॉर ऑल यांनी हे पुस्तक तयार केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2012 रोजी प्रकाशित
चतुरंगच्या ‘एक कलाकार’ उपक्रमात अभिनेते शरद पोंक्षे
चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ या उपक्रमांतर्गत येत्या ४ डिसेंबर रोजी दादर पश्चिमेकडील दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे सहभागी होणार आहेत.
First published on: 28-11-2012 at 11:41 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sharad pokshe in chaturang one actor program