अन्यायग्रस्ताचा उपोषणाचा इशारा
२००९-१० मध्ये आदिवासी विभाग नाशिक अंतर्गत १०१ प्राथमिक शिक्षक सेवक पदांसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याची तक्रार बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील सुनिता निकम यांनी केली आहे. आपणास न्याय न मिळाल्यास सात सप्टेंबरपासून नाशिक येथे कुटूंबातील सर्व सदस्यांसह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या भरती प्रक्रियेत मौखिक परीक्षेत पात्र असूनही मुलाखत पत्र आपणांस मिळाले नाही. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. परंतु सहा वर्षांचा अनुभव, सर्वशिक्षा अभियानाचे जिल्हास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षणासाठी निवड तसेच कब बुलबुल प्रशिक्षण, उच्च पदवीधर अशी पात्रता असताना तसेच इतरांकडे तशी पात्रता नसतानाही लेखी परीक्षेतही अन्य उमेदवारांना १७२ पेक्षा कमी गुण असूनही त्यांची निवड करण्यात आली. याप्रकरणी सात जून रोजी संबंधितांकडे लेखी निवेदन देऊनही अद्यापपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही. अपर आयुक्तांशी संपर्क साधला असता आता निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता तुम्ही वारंवार कार्यालयात येऊ नका, असे पत्राव्दारे समजावण्यात आले. आपणांस न्याय मिळावा अशी अपेक्षा निकम यांनी केली आहे.