ठेवीदारांच्या बचत खात्यातील रक्क म वेळेवर देण्यास नकार देणाऱ्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅंकेच्या अधिकारी, कर्मचारी व संचालक मंडळाचे पदाधिकारी, अशा ३६ जणांविरुध्द खामगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदुरा येथील बचत खातेधारक अ‍ॅड. शशिकांत वामनराव बगे यांनी खामगाव न्यायालयात दाखल केलेल्या खासगी फ ौजदारी प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्देशावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या आरोपींमध्ये जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे, उपाध्यक्ष प्रतापराव जाधव, तत्कालीन कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल, विद्यमान व्यवस्थापक अरुण चव्हाण यांच्यासह बॅंकेचे संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.  
या जिल्ह्य़ातील नांदुरा येथील अ‍ॅड. शशिकांत वामनराव बगे यांचे जिल्हा सहकारी बॅंकेच्या खामगाव शाखेत बचत खाते आहे. त्यांनी त्यांच्या या खात्यात  सुमारे पावणेदोन लाख रुपयांची बचत ठेव जमा केली आहे. बगे यांना पाठीच्या मणक्याचा दुर्धर आजार असल्याने उपचारासाठी पैशाची नितांत आवश्यकता होती. त्यांनी ३ ऑगस्ट २०१२ ते ३१ ऑगस्ट २०१२ दरम्यान वेळोवेळी बॅंकेकडे पैशाची मागणी केली. रिझव्‍‌र्ह बॅंकेचे प्रतिबंध असल्याने पैसे देता येणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी अ‍ॅड. बगे यांना पत्राद्वारे कळविले. आपल्या बचत खात्यातील हक्काचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने अ‍ॅड. बगे यांनी खामगाव न्यायालयात जिल्हा केंद्रीय सहकारी बॅॅंकेचे संचालक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. न्यायालयाने या फिर्यादीवर सुनावणी करून फिर्याद ग्राह्य़ मानून बॅंकेच्या संचालक, पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह एकूण ३६ जणांच्या विरोधात फ ौजदारी गुन्हे दाखल करण्याचे खामगाव शहर पोलिसांना आदेश दिले. त्यानुसार खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी संबंधित आरोपींविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.
यात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, बॅंकेचे उपाध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव, माजी अध्यक्ष ध्रुपदराव सावळे, संचालक बुलढाण्याचे आमदार विजयराज शिंदे, चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर, जळगांव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, अर्थ व नियोजन सभापती बलदेवराव चोपडे, बाबूराव कोल्हे, नरेंद्र बोबडे, विश्वास बोरोकार, भोंडे, मीनाक्षी बुरुंगले, अरुणा पवार, शारदा पाटील, सुनीता शिंदे या संचालकांसह माजी संचालक आमदार पांडूरंग फुंडकर, तत्कालीन जिल्हा उपनिबंधक, बॅंकेचे अधिकारी एम.ए. क ोहोक, आशिष मोदी, विनायक कोलते, किशोर बोबडे, विजय मारोडे, नरेंद्र बाहेकर, ए.एस. चव्हाण, ए.डी. इंगोले, व्ही.बी. पारडे, बॅंकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र बकाल, शाखा व्यवस्थपक संतोष गिरी या ३६ जणांचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांच्या विरोधात कॉंग्रेस नेते डॉ. राजेंद्र गोडे यांच्या तक्रारीवरून यापूर्वीच बुलढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेवीदार व खातेदारांच्या ठेव रकमा परत मिळण्यास विलंब होत  असल्याने ते न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.