परभणीत दोन तास बससेवा बंद
एस. टी. महामंडळाच्या परभणी आगाराचे प्रमुख जगतकर यांनी जिंतूर डेपोच्या वाहकास शिवीगाळ व मारहाण केल्याच्या प्रकारानंतर शनिवारी सकाळी वाहक व चालकांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे दोन तास आगारातून एकही बस बाहेर न पडल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली.
जगतकर यांच्याबाबत वाहक व चालकांच्या अनेक तक्रारी आहेत. ते कर्मचाऱ्यांना उद्धट बोलतात. शनिवारी जिंतूर आगारात बसचे चाक पंक्चर झाल्याने ही बस परभणी आगारात नेण्यात आली. वाहक राजेश कुमटेकर यांनी पंक्चर काढून देण्याबाबत जगतकर यांना विनंती केली. तेव्हा जगतकर यांच्यातील ‘साहेब’ जागा झाला व त्यांनी कुमटेकर यांना शिवीगाळ, तसेच मारहाण केली. त्यामुळे कुमटेकर हे आगारातून बाहेर पळाले व त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते विनोद दुधगावकर व गुरुदत्त पहेलानी यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा हे दोघे बस स्थानकावर पोहोचले. वाहक कुमटेकर यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच इतर वाहक व चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. पोलीस अधिकारी संदीप डोईफोडे हेही घटनास्थळी पोहोचले. मनसेचे कार्यकर्ते व महामंडळाचे अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वाहक कुमटेकर यांना मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिंतूर व पाथरी येथेही काम बंद आंदोलन करण्यात आले. अखेर जगतकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता बसवाहतूक सुरळीत झाली.