आयआरबी कंपनीने १७ ऑक्टोबरपासून टोलआकारणी करण्याचे ठरविले असले तरी त्यास विरोध दर्शवत टोलविरोधी कृती समिती आदल्या दिवशी मध्यरात्री टोल नाक्यांवर पहारा देऊन टोलधाड परतवून लावण्यासाठी उभी राहणार आहे. टोलआकारणीचा १७ ऑक्टोबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जाणार असून, या दिवशी सकाळी टोल नाक्यांजवळ मानवी साखळी उभारण्यात येणार आहे. तर उद्या महापौर व आयुक्त यांना टोलआकारणीसाठी विरोध करावा या मागणीचे निवेदन दिले जाणार आहे. हा निर्णय सोमवारी सायंकाळी झालेल्या टोलविरोधी कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील होते.    
संभाव्य टोलआकारणीच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा मेळावा झाला. मेळाव्यात वरीलप्रमाणे आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कृती समितीशी चर्चेला येण्याचे पत्र पाठविले आहे. पत्रातील मजकूर तोच असून त्यातील तारखा वेगळय़ा आहेत. अशा पत्रांची मला सवय झाली आहे, असे म्हणत कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी मंत्र्यांना टोल लगावला.     
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी टोलआकारणीसाठी संरक्षण पुरविण्याचे ठरविले आहे. त्यास प्रखरपणे विरोध करण्यात येईल. गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर दाखल केलेल्या गुन्हय़ापेक्षा गंभीर गुन्हे दाखल झाले तरी टोलरूपाने नया पैसाही देणार नाही. टोलआकारणीसाठी नाक्यांवर गुंडांना आणल्यास मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल, असा इशारा राजू जाधव यांनी दिला.     राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा प्रश्न मारहाणीपेक्षा चर्चेने सोडवावा, अशी सूचना केली असल्याचे सांगितले. तर कॉ. चंद्रकांत यादव यांनी हा प्रश्न सोडविण्याची हिंमत मंत्र्यांमध्ये नसल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतराव पवार, रामभाऊ चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, नंदकुमार वळंजू, नगरसेवक सत्यजित कदम आदींची भाषणे झाली.