शहराला लागून असलेल्या दसाणे व लोणवाडे शिवारातील तीन हाडांच्या कारखान्यांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असतांना ते बंद करण्यासाठी प्रशासनाकडून कुचराई होत असल्याच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी बुधवारी येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून दिवसभर धरणे आंदोलन केले. हे कारखाने आठ दिवसात बंद न केल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
हाडांच्या या कारखान्यांमध्ये प्रक्रिया केली जाते तसेच तेथील आवारात मोठय़ा प्रमाणावर हाडे साठविली जातात. त्यामुळे लोणवाडे, दसाणे, खडकी, सायने आदी परिसरातील गावांमध्ये असह्य दरुगधी निर्माण झाली आहे. तसेच डास माशांची संख्या वाढून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. मळमळणे,चक्कर येणे, उलटय़ा होणे असे आजार बळावत असून विशेषत: बालके व वृध्दांना या दरुगधीमुळे विविध आजारांची शिकार व्हावे लागत आहे. दरुगधीयुक्त पाणी जमिनीत झिरपत असल्याने पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत. शिवाय ही दरुगधी असह्य होत असल्याने परिसरात शेती कामासाठी मजूर येत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.
हे कारखाने बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र प्रत्येकवेळी केवळ आश्वासनांवरच बोळवण केली गेल्याचा आक्षेप आंदोलकांनी नोंदविला. आ. दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. हाडांच्या कारखान्याचा प्रश्न विधीमंडळात उपस्थित झाला होता. तेव्हा हे कारखाने प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे मान्य करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले गेल्याचे लेखी उत्तर पर्यावरण मंत्र्यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात कारखाने बंद करण्याची कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभांमध्ये परिसरातील सर्व गावांनी या प्रश्नी निकराची लढाई लढण्याचा इशारा दिला होता. त्याचाच भाग म्हणून हा मोर्चा काढत धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींची संख्याही लक्षणीय होती.
यावेळी हे कारखाने बंद करावीत आणि त्यांना बेकायदेशीरित्या परवानगी देणारे आणि गावकऱ्यांच्या तक्रारींना कचऱ्याची टोपली दाखवत अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. आंदोलनात लोणवाडय़ाचे सरपंच युवराज गोलाईत, दसाण्याचे सरपंच संभाजी शेवाळे, खडकीच्या सरपंच देवकाबाई मगरे, सायन्याच्या सरपंच आशाबाई सूर्यवंशी, सेनेचे शहराध्यक्ष रामा मिस्तरी, सुनील देवरे आदी सामील झाले होते.