माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या संशोधनापेक्षा शेती क्षेत्रातील संशोधन अधिक महत्त्वपूर्ण आहे. कृषिप्रधान भारत देशाच्या प्रगतीसाठी यामुळे खऱ्या अर्थाने हातभार लागणार आहे, असे मत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधक डॉ. सॅम पित्रोदा यांनी शनिवारी येथे बोलताना व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा ४९ वा दीक्षांत समारंभ व पदवी प्रदान कार्यक्रम शनिवारी झाला.
यावेळी डॉ.पित्रोडा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. केंद्रीय विद्यापीठ गुजरातचे कुलपती डॉ.योगिंदर अलघ यांच्या हस्ते पदवी प्रदान कार्यक्रम झाला. डॉ.अलघ यांच्या हस्ते सॅम पित्रोदा यांना शिवाजी विद्यापीठाच्या वतीने डी. लिट. ही मानाची पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली. डॉ.अलघ यांच्या हस्ते परिणिता या विद्यार्थिनीस राष्ट्रपती पदक देण्यात आले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा व त्याव्दारे भारतात झालेल्या वेगवान बदलाचा आढावा घेऊन डॉ.पित्रोडा म्हणाले, देशामध्ये गेल्या २० वर्षांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विकसित झाले आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे या क्षेत्रात काम करण्याची व्यापक संधी मिळाली. घरोघरी दूरध्वनीचे जाळे अल्पावधीतच पसरले गेले. आतातर मोबाईल क्षेत्रातही नवनवे प्रयोग होत आहेत. या क्षेत्रातील संशोधन जसे महत्त्वाचे आहे तसेच शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान विकसित होणे अतिशय महत्त्वाचे आहे. देशात शेतीचे क्षेत्र मोठे असल्याने व त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्याही प्रचंड असल्याने या क्षेत्रात नवतंत्रज्ञान रूजविले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या शिवाजी विद्यापीठाने याबाबतीत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी विद्यापीठाच्या ५० वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला. सुवर्णमहोत्सवी वर्षांसाठी राज्य शासनाने ७० कोटींचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ४२ कोटी प्राप्त झाले आहेत. त्यातूनच यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास केंद्र सुरू केले असून त्याव्दारे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विविध प्रकारच्या संशोधनासाठी निरनिराळ्या संशोधन संस्थांकडून १५ कोटी रुपये मंजूर झाले असून ती विद्यापीठाच्या दृष्टीने लक्षणीय गोष्ट आहे. दरम्यान आजच्या सोहळ्यात ३१ हजार विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ पार पडला. पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहत होता. पदवीच्या गाऊनमध्ये पदवी पत्रासह छायाचित्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती.