निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस सर्वत्र नाकाबंदी करून तपासणी करत आहेत. या दरम्यान अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्य़ात १ कोटी २४ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आली. तर अनेक ठिकाणी लाखो रुपयांची अवैध दारू जप्त करून पोलिसांनीही विविध पक्षांचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नाकात दम आणला आहे.
अमरावती पोलिसांनी बडनेरा व देवगाव नाक्यावर दोन वाहनांची तपासणी करून एकूण २० लाख ९० हजार ९०० रुपयांची रक्कम जप्त केली. याप्रकरणी स्वप्नील सत्यनारायण तिवारी (२८, शेडगाव), विनोद आसाराम डोंगरे (२५, रा. खोरज, िहगोली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही रक्कम कापडाच्या खरेदीसाठी घेऊन आलो होतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, पोलीस या बयानाची सत्यता पडताळून पाहात आहेत. दुसऱ्या घटनेत धामणगाव रेल्वे तालुक्यात देवगाव नाक्यावर पोलिसांनी १५ लाख ८४ हजार रुपये ताब्यात घेतले. देवगाव नाक्यावर परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ए.जी. खान, उपनिरीक्षक पठाण हे पोलीस ताफ्यासह वाहनांची तपासणी करत होते. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान एम.एच. २९/एन/९८१६ या आल्टो कारची तपासणी केली असता त्यात रोख १५ लाख ८४ हजार रुपये आढळून आले.
पोलिसांनी याप्रकरणी माहुली येथील धान्य व्यापारी रुपेश वानखडे व वाहनचालक सचिन कवाळे यांना ताब्यात घेऊन रक्कमही ताब्यात घेतली आहे. ही रक्कम बाभूळगावहून धामणगावकडे आणली जात होती. सोमवारी धामणगावातून खरेदी केलेला हरभरा व कापसाचा चुकारा करण्यासाठी ही रक्कम घेऊन जात होतो, असे वानखडे यांनी पोलिसांना सांगितले. सोमवारी त्यांनी धामणगावातील स्टेट बँकेतून ही रक्कम काढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार एन. के. सुरजुसे यांनी घटनास्थळाला भेट देऊन सत्यस्थिती जाणून घेतली. चंद्रपूर जिल्ह्य़ात बल्लारपूर मार्गावरील प्रसन्न पेट्रोलपंपासमोर पोलीस पथकाकडून वाहनांची तपासणी करत असताना बल्लारपूरकडून चंद्रपूरकडे येणाऱ्या एमएच/३४/एए/५३१६ या क्रमांकाच्या स्विफ्ट कारमध्ये रोख १० लाख ५० हजारांची रक्कम आढळून आली. याप्रकरणी कारमालक सुरेशकुमार राजपालसिंग बैसला, रा. विसापूर यांना रकमेसह ताब्यात घेतले आहे. बैसला यांचा राखेच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय असून याच व्यवसायाच्या व्यवहारातील ही रक्कम असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
यवतमाळ शहराच्या सीमांवरील तपासणीदरम्यान तीन वाहनांमध्ये एक कोटी ९० लाख रुपये मिळून आली. ही रक्कम बँकांची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोडून देण्यात आले. त्यात यवतमाळ अर्बन बँकेच्या ५० लाख आणि स्टेट बँकेच्या ४० लाख रुपयांचा समावेश आहे. ही रक्कम कळंब व राळेगाव शाखेसाठी जात होती. अन्य एका घटनेत पोलिसांनी नांदेड जिल्ह्य़ातील रुई येथील शिवाजी तुकाराम कदम यांच्या ताब्यातून ४ लाख ७८ हजार रुपये जप्त केले. भंडारा जिल्ह्य़ात साकोली पोलिसांच्या चमूने मंगळवारी दुपारी सेंदुरवाफा टोल नाक्यावर चारचाकी वाहनातून तीन लाखांची रक्कम जप्त केली. वाहनात असलेले सागर पितळे यांची विचारपूस केली असता त्यांनी ही रक्कम कालव्याच्या कामावर असलेल्या मजुरांना वाटण्यासाठी घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले.
त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून २४ मार्चपर्यंत अमरावती विभागात ३२ लाख ६७ हजार ३४८ रुपये किंमतीची अवैध दारू पकडली. तसेच २६४ ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध टाकलेल्या धाडीत ४५३ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८ लाख ५८ हजार रुपये जप्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahead of election 25 crores cash seized in vidarbha
First published on: 28-03-2014 at 08:17 IST