अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादनाबाबत प्रस्ताव तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाला असून त्या प्रस्तावांची छाननी सुरू आहे. यासंबंधीच्या एका तारांकित प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत या प्रश्नाला लेखी उत्तर दिले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, नागो गाणार, डॉ. रणजित पाटील, वसंतराव खोटरे, डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे, एम. एम. शेख, प्रा. सुरेश नवले व प्रवीण पोटे यांनी अकोला शहरातील विमानतळाची धावपट्टी वाढविण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्रालयातील तत्कालीन अप्पर मुख्य सचिव (विमानचालन) यांच्या दालनात २४ ऑगस्टला अकोला शहरातील विमानतळाची धावपट्टी वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. अकोलाचे जिल्हाधिकारी व भारतीय विमानपत्तन व प्राधीकरण अधिकाऱ्यांची ४ नोव्हेंबर २०११ रोजी बैठक झाली होती.
 अकोला विमानतळावर १ हजार ४०० मीटर लांबीची धावपट्टी (एटीआर) ७२ प्रकारची विमाने विमानतळावर उतरण्याच्या दृष्टीने ४०० मीटर वाढविण्याची सूचना त्यात केली आहे. विमानतळ विस्तारासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची निरीक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भूसंपादनाबाबत अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी ३० ऑक्टोबर व ७ नोव्हेंबरला प्रस्ताव सादर केले. त्या प्रस्तावांची छाननी सुरू असल्याचे लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.