अकोला जिल्ह्य़ातील बलात्कार आणि छेडखानीचे प्रकरण पाहिल्यावर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.  शहरातील महाविद्यालये व शिकवणी वर्गाच्या मार्गावर सतत होणारी छेडछाड मुलींना त्रासदायक ठरते. रोडरोमिओंना वठणीवर आणण्याची गरज असताना शहर पोलीस दलाचा दबदबा शहरात दिसत नाही. याचा सर्वाधिक त्रास महाविद्यालयीन तरुणींना होतो. शहरात छेडछानी विरोधीपथक कार्यान्वित करण्याची गरज असून या पथकाची जबाबदारी सक्षम महिला अधिकाऱ्यांकडे असावी, अशी मागणी पुढे येत आहे.
 जिल्ह्य़ातील बलात्कार आणि छेडखानीच्या प्रकरणांची गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यावर ही भीषणता स्पष्टपणे समोर येते. पाच वर्षांत जिल्ह्य़ात बलात्कारांच्या सुमारे ११७  घटना घडल्या. त्यातील बलात्कारची १७ प्रकरणे २०१२ मधील आहे. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांत जिल्ह्य़ातील छेडखानीची सुमारे ४६४ प्रकरणे पोलीस दफ्तरी नोंदली आहेत. यापैकी ६५ यंदाच्या वर्षांतील आहे. छेडछानीच्या अनेक प्रकरणात मुली व त्यांचे पालक उगाच त्रास नको म्हणून पोलिसात तक्रार नोंदवित नाहीत, अशी अनेक प्रकरणे गुलदस्त्यात राहतात. त्यामुळे जिल्ह्य़ात यापेक्षा जास्त छेडखानीच्या घटना होतात, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. अनेक प्रकरणात राजकारण्यांद्वारे होणारे हस्तक्षेप व त्यामुळे प्रत्यक्षात पोलिसात गुन्हे दाखल होत नाही.
गेल्या पाच वर्षांत बलात्काराच्या घटना पाहिल्यावर केवळ यंदाच त्यात घट झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. २००८ मध्ये २६ बलात्कार व १११ छेडखानीची प्रकरणे झाली. असेच २००९ मध्ये २१ बलात्कार व ९५ छेडखानी, २०१० मध्ये १०० छेडखानी व २५ बलात्कार झाले, तर २०११ मध्ये सर्वाधिक ३० बलात्कार व ९३ प्रकरणात छेडखानीचे गुन्हे नोंदविण्यात आले. ग्रामीण भागात अशा अनेक घटना घडतात, पण त्या पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत नाही. अकोला शहरात महाविद्यालय व शिकवणी वर्गाबाहेर रोडरोमिओंची मोठी रांग पार करत मुलींना प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर शहरातील मुलींच्या अनेक वसतीगृहांबाहेर टवाळखोरांचे दिवसरात्र असलेले संमेलन पोलिसांना मोडावे लागतील.वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलींना फूस लावणाऱ्यांचा बंदोबस्त पालकांना सजग राहात करावा लागेल. सिव्हील लाईन मार्ग, कृषी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, इंजिनीअरिंग कॉलेज, जवाहर नगर, गौरक्षण रोड या ठिकाणी जाणाऱ्या मुलींना याचा मोठा फटका बसतो. सततच्या घटनांवरून शहरातील गुंडगिरीला लगाम लावण्यात पोलिसांना आलेले अपयश उघड होते. शहर बसवाहतूक, बसस्थानक व रेल्वे स्टेशन या भागात रोज मुलींना छेडण्याचा प्रकार सतत होतो. या ठिकाणी कायम महिला पोलिसांची तैनाती आवश्यक असून तसे होताना दिसत नाही. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही.
रस्त्यावर व घराबाहेर स्त्री सुरक्षित आहे, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी पोलिसांना अथक प्रयत्न करावे लागतील. पोलिसांनादेखील मुली आहेत, याचा त्यांना विसर पडू नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यां अरुंधती शिरसाट यांनी केले. अकोल्यात मुली सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतची सुरक्षा करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महिला व मुलींना संघटीत व्हावे लागेल.
मुलींनी घराबाहेर होणारा त्रास पालकांना नि:संकोच सांगावा, तर तो कमी होऊ शकतो. यासाठी पालकांनादेखील मुलांना मित्र करावे लागेल, तसेच आवश्यकता नसेल तर मोबाईल देऊ नये, असेही त्या म्हणाल्या. वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलींबाबत पालकांनी अधिक जागृत राहण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.