पळसोबढे येथील बढे परिवारातील मुलीचे लग्न ठरले व तिथीनुसार काल शनिवारी लग्न होणार होते, पण वेळ झाल्यावरही लग्नमंडपात वराचा अथवा वराकडच्या कोणाचा पत्ताच नव्हता. वधूकडच्यांनी याबाबत वराकडील व्यक्तींशी भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता वरच यायला तयार नाही, तर वऱ्हाडी कशाला येतील, अशी कारणे सांगितली गेली. शेवटी वधूपित्याने गावातल्याच ओळखीच्या तरुणाच्या हाती आपल्या लेकीचा हात दिला व हे लग्न पार पडले.
अमरावती जिल्ह्य़ातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निमसवाडा येथील विश्वनाथ उर्फ प्रफुल्ल भोजराज भेंडे या युवकासोबत पळसोबढे येथील बढे कुटुंबातील मुलीचे लग्न जुळले. लग्नासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली व मूíतजापूरजवळील पळसो मार्गावरील क्विन्स लॅन्ड गार्डन हे लग्नस्थळ निश्चित झाले. आज सकाळपासूनच वधूकडील मंडळी वरातीची प्रतीक्षा करीत होते.
वेळ जसजसा जात होता तसतशी वधूकडील मंडळी चिंताक्रांत होत होती. कारण, वराचा व वरातीचा पत्ताच नव्हता. मध्यस्थांना याबाबत विचारणा केल्यावर वेगळीच उत्तरे वधूकडील मंडळींना मिळत होती. वराकडील मंडळींनी भरपूर हुंडा घेतल्यावरही वर लग्नास आला नाही. शेवटी वधूपित्याने आपल्या गावातील परिचित मुलासोबत मुलीचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत सर्वाशी विचारविनिमय करून शेवटी त्या मुलाशी मुलीचे लग्न लावण्यात आले.
सहकार नेते व माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांनी ही परिस्थिती पाहून वधूकडील मंडळीशी संवाद साधून या समस्येतून मार्ग काढण्यास मोलाची मदत केली.