मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी हिंदीतील अनेक कलाकार-दिग्दर्शक पुढे येऊ लागले. त्यातलं सगळ्यात मोठं नाव होतं ते अक्षय कुमार आणि त्याच्या ग्रेझिंग गोट प्रॉडक्शन बॅनरचं. अक्षय चांगलं मराठी बोलत असला तरी तो सहजपणे मराठीकडे वळला नव्हता. हिंदी ते मराठी हा त्याचा ‘७२ मैला’चा प्रवास घडला त्यामागे एक नाव होतं ते अश्विनी यार्दीचं. ‘झी’ आणि ‘कलर्स’ सारख्या नामांकित वाहिन्यांना आशयात्मकदृष्टय़ा दर्जेदार बनवण्याचे श्रेय हे अश्विनीकडे जातं. ‘कलर्स’ वाहिनी सुरू झाली तीच मुळी उत्तम आशय आणि उत्तम व्यवसायाचं गणित जमवून आणणाऱ्या अश्विनी यार्दीसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर. ‘कलर्स हे माझं बाळ होतं..’ म्हणणाऱ्या अश्विनीने या बाळाला अवघ्या काही दिवसांत चांगलं सुदृढ बनवलं. आणि ती कायम त्याच्याबरोबर राहणार असं वाटत असताना वाहिन्यांची रूळलेली वाट सोडून ती चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरली.
‘कलर्स’ वाहिनी स्थिरावली आणि मला तिथेच अडकू न पडल्यासारखं वाटू लागलं होतं. त्याच कल्पना, तसेच शो, सेट्स, कधीतरी रिअ‍ॅलिटी शो..आता त्या गोष्टी मनाला फार स्पर्शून जाणाऱ्या वाटत नव्हत्या. शिवाय, वाहिन्यांची आर्थिक आघाडी सांभाळताना कोही गोष्टींचा दबाव तुमच्यावर असतो. मला त्यातून बाहेर पडायचं होतं. मला एखादा सुंदर विषयावरचा चित्रपट करायची इच्छा होती. कधीतरी ‘फीअर फॅक्टर’च्या सेटवर काम करत असताना मी अक्षय कुमारला ही इच्छा बोलून दाखवली होती. आणि काही महिन्यांनंतर त्याचाच मला फोन आला, तुला हवी होती तशी एक पटकथा माझ्याकडे आली आहे. तुला कथा आवडली तर आपण एकत्र चित्रपट करूयात. अशातऱ्हेने, आमची जोडी एकत्र आली. ‘ग्रेझिंग गोट प्रॉडक्शन’ची सुरूवात झाली आणि आमचा पहिला चित्रपट यशस्वी ठरला तो ‘ओह माय गॉड’. अश्विनी यार्दीकडून हा प्रवास ऐकल्यावर ‘ओएमजी’ सारखा पहिला हिंदी चित्रपट यशस्वी झाल्यावर दुसरा मराठी चित्रपट का करावासा वाटला?, हा प्रश्न साहजिक होता. त्यावर यामागे माझं मराठी कनेक्शन आहे, असं अश्विनी सांगते. अश्विनीचे आजोबा बाबुराव पै हे प्रभात कंपनीचे भागीदार होते. ‘आजोबांमुळे प्रभातचे तेव्हाचे आशयसंपन्न चित्रपट घडताना, तिथल्या कलाकारांचा आमच्या घरात असणारा वावर, नंतर आलेल्या अडचणी, मराठी चित्रपटांचा त्यानंतरचा प्रवास या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटनिर्मिती ही माझ्यादृष्टीने महत्त्वाचीच होती’, असं अश्विनी सांगते. पण, ‘७२ मैल एक प्रवास’ ठरवून केला नाही हेही ती स्पष्ट करते.
अशोक व्हटकरांची ‘७२ मैल’ ही कादंबरी मी वाचली तेव्हा त्याच्यावर चित्रपट करायलाच हवा, हे मला प्रकर्षांने जाणवलं. मी ही कथा अक्षयला ऐकवली. त्यालाही ती आवडली आणि मग चित्रपटाची सुरूवात झाली. राजीव पाटील यांचा ‘जोगवा’ पाहिला होता त्यामुळे ‘७२ मैल’ सारख्या वास्तवातील कथेला तेच न्याय देऊ शकतील, असा विश्वास वाटला. आणि मग त्यांच्या माध्यमातूनच कलाकार, तंत्रज्ञ, चित्रिकरण या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. ‘७२ मैल एक प्रवास’ हा आमच्या कलाकारांमुळे घडला आहे, असं म्हणायला हरकत नाही, असं सांगणाऱ्या अश्विनीने स्मिताच्या अभिनयाची प्रशंसा केली. ‘झी’ आणि ‘कलर्स’सारख्या वाहिन्यांना नावारूपाला आणताना तुझा नेमका विचार काय होता?, हे विचारल्यावर २० वर्ष मी त्या व्यवसायात होते, अशी सुरूवात ती करते. १९९३ साली टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांचा प्रेक्षक बदलला होता. ‘झी’ तेव्हा सास-बहू मालिकांमध्ये अडकल्यामुळे नव्या विचारांपासून, जाणिवांपासून दूर होते. त्यामुळे क्रिएटिव्ह हेड म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मी प्रेक्षकांच्या मनाचा कौल कुठे आहे, याचा अभ्यास केला. त्यानुसार नवनविन विषय हाताळले. आणि ते यशस्वीही ठरले. ‘कलर्स’मध्येही ‘बालिकावधू’सारखा विषय समोर आल्यानंतर काही सेकंदात मी होकार दिला होता. कारण, हे आपल्या मातीतले, संस्कृतीतले विषय होते, समस्या होत्या. त्या प्रेक्षकांसमोर आणणे गरजेचे होते. त्याला प्रतिसादही प्रचंड मिळाला. आता चित्रपटनिर्मितीतही बदलत्या प्रवाहांचा विचार करूनच विषय निवडण्यावर माझा भर आहे, असे ती सांगते. अक्षयकडून तुझ्या निवडीवर किंवा विचारांवर बंधनं येतात का?, या प्रश्नाला तिने ‘ग्रेझिंग गोट’ची संपूर्ण जबाबदारी अक्षयने आपल्यावर सोपवली असल्याचे सांगितले. मालिकानिर्मितीचे अनेक प्रस्ताव तिच्याकडे येणे साहजिक होते तसे ते आहेतही पण, जोपर्यंत चित्रपट निर्मितीत स्थिरावणार नाही तोपर्यंत अन्य कुठलीही जबाबदारी न घेण्याचा आपला निर्धारही अश्विनीने स्पष्ट केला.