बॉलीवूडच्या वरच्या फळीतील जे पंचम आहेत त्यांच्या नायिका हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यांच्या चित्रपटात एखादी जरी भूमिका करायला मिळाली तरी त्या त्या अभिनेत्रींसाठी फार मोठी कामगिरी साधली जाते. या पंचम फळीत नेहमी नित्यनव्या अभिनेत्रींना संधी देण्यात सलमानच्या पाठोपाठ कोणाचे नाव येत असेल तर ते अक्षय कुमारचे. सलमानने कतरिनाला बॉलीवूडमध्ये आणले असले तरी तिला इथे स्थिरस्थावर व्हायला अक्षयनेच मदत केली हे स्वत: कतरिनाही ओरडून सांगते. त्यामुळे ‘बॉस’ या चित्रपटासाठी अक्षय कु मारने अदिती राव हैदरीला संधी दिली तेव्हा भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या. पण ही पठ्ठी मात्र अक्षय कु मारने आपली तारीफ केली म्हणून ‘बॉस’साठी होकार दिल्याचे सांगत सुटली आहे.
‘बॉस’ चित्रपटात शिव पंडित या अभिनेत्याची नायिका म्हणून अदिती दिसणार आहे. तू ‘बॉस’साठी होकार का दिलास, असा प्रश्न अदितीला विचारला गेला तेव्हा ‘मर्डर २’ या माझ्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच दिग्दर्शक अश्विन वर्दे यांनी माझी भेट घेतली होती. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना माझे काम आवडले आणि त्यांनी अक्षय कुमारची भेट घडवून आणली. प्रत्यक्ष भेटीत अक्षयने माझी तारीफच सुरू केली.. असे अदिती सांगते. ‘तुझे काम मला आवडले आहे. पण ‘बॉस’ हा मोठय़ा बजेटचा आणि वेगळा चित्रपट आहे. एवढय़ा मोठय़ा चित्रपटात काम करण्याची तुझी ही पहिलीच वेळ असेल. पण आतापर्यंत मी ज्या अभिनेत्रींबरोबर काम केले आहे मग ती कतरिना असेल नाहीतर सोनाक्षी सिन्हा.. त्या आता मोठय़ा स्टार झाल्या आहेत. त्यामुळे तुझ्यातही इतकं चांगलं काम करण्याची क्षमता आहे.. इत्यादी. इत्यादी..’ अक्षय कुमारच्या तोंडून हे असं कौतूक ऐकताना मी हुरळून गेले नसते तरच नवल, असं सांगणाऱ्या अदितीने केवळ अक्षयने तोंडभरून केलेल्या या कौतुकापोटीच आपण ‘बॉस’ला होकार दिल्याचा डंका पिटवते आहे.