भिमाक्षरा अकादमीच्यावतीने अखिल भारतीय आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन २ व ३ मार्चला आझाद मदानावर करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. कौशल पवार राहतील. संमेलनाचे उद्घाटन डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून वर्षां निकम यांची निवड करण्यात आली तर प्रमुख पाहुणे म्हणून सुकिर्थाराणी (तामिळनाडू), डॉ. डब्ल्यू मायादेवी (आंध्रप्रदेश), राही भिडे उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ापासून २ मार्चला सकाळी १० वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार असून संमेलनाध्यक्ष डॉ. कौशल पवार, उद्घाटक डॉ. उज्ज्वला जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबा फॉस्टीना देवकुमार, जयंत परमार, निर्मला पुतूल, आनंद गायकवाड, डॉ.डब्ल्यू. मायादेवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता संजय जीवने लिखित ‘दिशा’ हा नाटय़प्रयोग सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता ‘स्त्री अत्याचार आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेची भूमिका’ या विषयावर परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी सीमा साखरे राहतील. यात प्रा. माहेश्वरी गावित, देवकुमार, प्रतिभा अहिरे, निर्मला पुतुल, डॉ. छाया, डॉ. स्मिता शेंडे सहभागी होतील.
सांस्कृतिक कार्यक्रम ३ मार्च रोजी होणार असून सकाळी ११ वाजता ‘साहित्य व माध्यमातील स्त्री चित्रण आणि वास्तव-आंबेडकरी लेखिकेपुढील आव्हाने’ या विषयावर परिचर्चा होणार असून अध्यक्षस्थानी राही भिडे राहणार आहेत. कविता आत्राम, डॉ. श्यामलाल गरुड, मंजू नागदिवे, छाया खोब्रागडे, प्रवीण कांबळे, डॉ. मायादेवी यांचा सहभाग राहील.
दुपारी २ वाजता ‘महिला सक्षमीकरण व विचारमंथन- अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट व करिअर गायडन्स’ या कार्यक्रमात समाजकल्याण विभागाच्या आयुक्त गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, उपायुक्त माधव वैद्य, रमेश कटके, कुलदीप रामटेके, अ‍ॅड. अरुण गजभिये उपस्थित राहतील. दुपारी ३ वाजता सुसंवाद या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अभिनया कांबळे या राहतील, तर प्रा. लीला भेले, सूर्यकांता पाटील, अ‍ॅड. नंदा फुकट, जैबुन्निसा शेख, कविता गेडाम, प्रा. माधव सरकुंडे आदी मान्यवर सहभागी होतील.
सायंकाळी ५ वाजता संध्या सराडकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अतिथी कवी म्हणून जयंत परमार, सुकिर्थारणी, अनिता मनोहर नाईक, अमर रामटेके सहभागी होतील. सायंकाळी ७ वाजता संमेलनाचा समारोप होणार असून यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. कौशल पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मनोहरराव नाईक, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, खासदार भावना गवळी, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार संदीप बाजोरीया, पुष्पा इंगळे, योगेश गढिया, माधुरी अराठे, अरिवद तायडे, राजुदास जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.