गोंदियात ७ ते ९ डिसेंबपर्यंत भवभूती रंगमंदिरात झालेल्या ६२ व्या विदर्भ साहित्य संमेलनातील ९ ठराव घेऊन त्यांचा पिच्छा पुरविणार असल्याचे तसेच या संमेलनाला उपस्थित केंद्रीय मंत्री व आमदारांनी दिलेले आश्वासन पाळण्यात कानाडोळा केला तर वेळेप्रसंगी आंदोलन करणार असल्याचेही सुतोवाच संमेलनाध्यक्ष डॉ.किशोर सानप यांनी केले. रविवारी रात्री ९.३० वाजता संमेलनाचे सूप वाजले. अध्यक्षीय भाषणात डॉ.सानप यांनी या संमेलनातील कार्यक्रम व आयोजकांचे कौतुक केले, पण रसिकांच्या अत्यल्प प्रतिसादाबद्दल यशवंत सरूरकर यांनी व्यक्त केलेल्या खेदाची नोंद घेणे अगत्याचे ठरते.
राज्याच्या पूर्व टोकाला व हिंदी भाषकबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्य़ाला तब्बल ५५ वर्षांनी विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन झाले. वैदर्भीय साहित्य विश्वाची जपवणूक करणारी व वैदर्भीय लेखकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेने साहित्यिक क्षेत्राशी असलेली जवळीक जोपासून ठेवली आहे. याची प्रचिती या निमित्ताने आली. या शहरात हे साहित्य संमेलन कसे होणार, याची आयोजकांनाही स्पष्ट कल्पना नसावी, मात्र यानिमित्ताने एकत्र आलेले विदर्भातील साहित्यिक व आयोजित केलेले कार्यक्रम व त्यांना मिळालेला रसिकांचा अत्यल्प प्रतिसाद यामुळे हे संमेलन पार तर पडले, पण रसिकांना सभागृहापर्यंत खेचण्यात अपयशी ठरल्याचे जाणवले. या निमित्ताने रसिकांना काही विशेष बाबी बघावयास मिळाल्या. उदघाटन समारंभाच्या प्रसंगी या लोकसभा मतदारसंघातील दोन राजकीय विरोधक केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व आमदार नाना पटोले एकाच व्यासपीठावर आले. हेच नाही, तर पटेलांच्या स्वगावी आमदार नाना पटोले यांनी संमेलनाच्या स्वागताध्यक्षांची भूमिका घेतल्यामुळे त्यांना पटेलांचे आदरातिथ्यही करावे लागले.
उदघाटन समारंभात विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या भाषणाला रसिकांनी भरपूर दाद दिली. विविध विषयांवरील परिसंवाद, कथाकथन, मुलाखत, अभिरूप न्यायालय, सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री झालेल्या  कवी संमेलनांनी विदर्भ साहित्य संघाने वाड्मयीन पंचपक्वान्नांची दालने उघडलेली असली तरी या जिल्ह्य़ातील विविध महाविद्यालये व तेथे भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांंनी मात्र या संधीचा उपयोग करून घेतला नाही. ही बाब संमेलनातील रसिकांच्या मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादावरून म्हणता येईल.
जिल्ह्य़ातील, तसेच शहरातील वाड्मयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे साहित्य संमेलन एक पर्वणीच होती, मात्र आयोजकांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच की काय, ज्यांना याची गरज होती त्यांनीही लक्ष दिले नाही, असेच म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांत विदर्भात ‘दलित साहित्य’क्षेत्रात नवनवीन साहित्य उदयास आले, तसेच पूर्व विदर्भातील रंगभूमीवरील कलावंत व ‘झाडीपट्टी बोली’तील साहित्यिकांनीही भरारी मारली आहे, मात्र या दोन्ही विषयांकडे आयोजकांनी दुर्लक्ष केले. पहिल्या दिवसापासून तर अखेरच्या दिवसांपर्यंत पूर्ण वेळ कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या ‘झाडीपट्टीतील बहिणाबाई’ म्हणून ओळख असलेल्या अंजनाबाई खुणे यांचा तेरा सत्रातील एकाही कार्यक्रमात सहभाग असू नये, याविषयी झाडीपट्टी साहित्यिक मंडळींच्या वर्तुळात तर कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ही बाब साऱ्या पूर्व वविदर्भाला कमालीची खटकली.