लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना काही महिनेच शिल्लक राहिल्याने विदर्भात राजकीय वारे घोंघावू लागले असून सध्यातरी भाजपने यात आघाडी घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृह जिल्ह्य़ात बैठकांची वावटळ उठवून दिली असून निवडणुका जिंकण्यासाठी ‘मोदी पॅटर्न’ राबविण्याचे सूतोवाच केले आहे. पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. यातूनच निवडणूक तयारीसाठी भाजपची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी काही पदाधिकाऱ्यांना डच्चू देऊन नव्या नियुक्तया केल्या आहेत. तर शिवसेनेने त्यांच्या ताब्यातील तिन्ही जागांसाठी चाचपणी सुरू केली आहे. दुसरीकडे यवतमाळ-वाशीम मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता सक्रिय झाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी ग्रामीण पातळीवर संघटन बळकटीची सूत्रे हलविणे सुरू केले आहे.
सद्यस्थितीत भाजपकडे चंद्रपूर (हंसराज अहीर) अकोला (संजय धोत्रे) या दोन जागा तर शिवसेनेकडे अमरावती (आनंदराव अडसूळ), यवतमाळ-वाशीम (भावना गवळी) आणि बुलढाणा (प्रतापराव जाधव) या तीन जागा आहेत. काँग्रेसकडे नागपूर (विलास मुत्तेमवार), गडचिरोली (मारोतराव कोवासे), रामटेक (मुकुल वासनिक) आणि वर्धा (दत्ता मेघे) अशा चार तर राष्ट्रवादीकडे भंडारा-गोंदिया (प्रफुल्ल पटेल) ही एकमेव जागा आहे. नितीन गडकरी आता नागपुरातूनच लढतील हे आता स्पष्ट झाले असून त्यांच्याविरोधात काँग्रेस विलास मुत्तेमवारांनाच पुन्हा उमेदवारी देणार वा ताज्या दमाच्या उमेदवाराची निवड करणार याची चर्चा सुरू झाली आहे. सात निवडणुकांचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या मुत्तेमवारांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या शेवटच्या टप्प्यातही डावलण्यात आले होते.
विदर्भातील लोकसभेच्या दहापैकी निम्म्या जागांवर युतीचे उमेदवार गेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते. यावेळी जास्त जागा खेचून आणण्याच्या दृष्टीने भाजपने बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे सक्त आदेश दिले आहेत. त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तयारी अद्यापही माघारलेली आहे. यवतमाळ विधानसभा पोटनिवडणूक जिंकून काँग्रेसला तात्पुरते यश मिळाले असले तरी अन्य जिल्ह्य़ांमधील राजकीय समीकरणांकडे श्रेष्ठींचे लक्ष अद्याप वळलेले नाही, याचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपने सुरू केला आहे.  
राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर एकतर्फी वर्चस्व आहे. अन्यत्र राष्ट्रवादीची ताकद फारशी नाही. परंतु, यवतमाळ-वाशीम मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत उच्चस्तरीय सूत्रांनी दिले आहेत. त्यामुळे मनोहर नाईक यांचे नाव शर्यतीत आले आहे.
शिवसेनेचे ताकद पूर्व विदर्भात चांगली आहे. अमरावतीचे प्रतिनिधीत्व आनंदराव अडसूळ करीत आहेत तर बुलढाण्यात प्रतापराव जाधव आणि यवतमाळ-वाशीमला भावना गवळी यांचीही मतदारसंघावर चांगली पकड आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या उन्हाळ्यात जंगी जाहीर सभा घेऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विदर्भातील काही पदाधिकारी तडाकाफडकी बदलून साफसफाई मोहीम सुरू केली आहे. मात्र, जिंकून येणारा चेहरा सध्यातरी मनसेजवळ नाही.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All party become active in vidarbha for upcoming election
First published on: 05-07-2013 at 03:23 IST