मुंबईच्या प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये अडकणाऱ्यांपैकी अनेक जण मनातल्या मनात बससकट हवेतून किंवा समुद्रातून इच्छितस्थळी पोहोचत असतात. पण आता खरंच हा चमत्कार प्रत्यक्षात उतरणार आहे. हवेतून उडून जमिनीवर व पाण्यावर उतरू शकणाऱ्या विमानाला हिरवा कंदील दिल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ अशीच जमीन व पाणी या दोन्हीकडे धावणारी बस सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी एमटीडीसीला सक्षम गुंतवणूकदार व ही योजना चालवणाऱ्या कंपनीची साथ हवी आहे.
पाश्चात्त्य देशांमध्ये तसेच दुबई, मलेशिया अशा अनेक ठिकाणी अशा अॅम्फिबियस बसेस चालतात. या बसेस रस्ता किंवा पाणी या दोन्ही मार्गावरून चालू शकतात. रस्त्यावर टायर म्हणून धावणारी चाके पाण्यात गेल्यानंतर बसला वल्हवण्यासाठी मदत करतात. हे तंत्रज्ञान असलेली ५० आसनी बस महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला नक्कीच हातभार लावेल, असे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांनी सांगितले.
या बस खरेदी करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्न करणार नसून हे काम एखाद्या खासगी कंपनीकडून करून घेतले जाईल. या सर्व प्रकल्पामध्ये एमटीडीसी समन्वयक म्हणून काम बघेल. राज्य सरकारकडून लागणाऱ्या परवानग्या मिळवणे, या नव्या सेवेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हे काम एमटीडीसीतर्फे केले जाणार आहे. या बसगाडय़ा कुठून कुठपर्यंत जाऊ शकतील, मुंबईपासून जवळच्या पर्यटन स्थळांपर्यंत त्या पोहोचू शकतील का, मुंबईतल्या मुंबईत दोन उपनगरांना जोडू शकतील का, याबाबतचे सर्वेक्षण खासगी कंपन्यांनी करायचे आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
जमिनीवर आणि पाण्यावर दोन्हीकडे उतरू शकणारे आणि दोन्हीकडून उड्डाण करू शकणारे विमान ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. त्यामुळे आता या अॅम्फिबियस बसचे स्वप्नही लवकरच प्रत्यक्षात उतणार आहे. मुंबईच्या उपनगरांमध्ये या बसगाडय़ा चालवल्या जातील किंवा नाही, याबाबत योग्य त्या परवानग्या हाती आल्याशिवाय काहीही बोलणे योग्य ठरणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2014 रोजी प्रकाशित
बस धावणार कधी तळ्यात, कधी मळ्यात
मुंबईच्या प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये अडकणाऱ्यांपैकी अनेक जण मनातल्या मनात बससकट हवेतून किंवा समुद्रातून इच्छितस्थळी पोहोचत असतात. पण आता खरंच हा चमत्कार प्रत्यक्षात उतरणार आहे. हवेतून उडून जमिनीवर व पाण्यावर उतरू शकणाऱ्या विमानाला हिरवा कंदील दिल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ अशीच जमीन व पाणी या दोन्हीकडे धावणारी बस सुरू करण्याचा विचार करत आहे.

First published on: 26-02-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amphibious bus project in mumbai