जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने ग्रामीण भागातील अंगणवाडय़ांना ‘डिजिटल लूक’ देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सभापती नंदा लोहबरे यांनी शासनाकडे लागणारा निधी मिळावा यासाठी निवेदन दिले असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
बारामती, राळेगणसिद्धी आणि शिर्डी आदी ठिकाणी महिला आणि बालकल्याण विभागाची सहल गेली होती. त्यावेळी त्यांनी तेथील अनेक विकासत्मक कामाकडे बघून जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांना नवल वाटले. सभापती नंदा लोहबरे यांनी हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटवार पवार यांच्याशी चर्चा करून, संवाद करून अनेक विकासात्मक सूचना लक्षात ठेवल्या. त्यांनी तेथे असलेल्या अंगणवाडय़ांना भेट दिले. तेथील सर्व दृश्य पाहून त्यांना कौतुक वाटले आणि तेथील बालकांना  ‘हायटेक’ शिक्षण मिळत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अशाच प्रकारचा प्रयोग नागपूर जिल्ह्य़ातही राबविण्याचा त्यांनी विचार व्यक्त केला. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे.
जिल्ह्य़ात २१६१ अंगणवाडी केंद्रे असून एक शिक्षिका आणि एक मदतनीस असे दोन कर्मचारी कार्यरत आहे. बालकांचे मनोरंजन, शिक्षण, आरोग्य याकडे अंगणवाडय़ांमध्ये लक्ष दिले जात असून त्यांना खेळणी देखील पुरविल्या जाते. परंतु त्यांना मनोरंजनाची साधने उपलब्ध नाही. त्यामुळे बालके फारशी तेथे रमताना दिसत नाही. म्हणूनच ‘डिजिटल लूक’ अंगणवाडय़ांना देण्याचा सभापती नंदा लोहबरे यांचा विचार असल्याचे सांगितले. बोलक्या भिंती, सुदृढ माता व सुदृढ बालके याविषयावर माहिती देणारे संदेश भित्तीचित्रांच्या माध्यमातून शिक्षण, सौर ऊर्जेवर चालणारा पंखा, बेबी टॉयलेट, सोलर लाईट, आधुनिक खेळणी आदी जर उपलब्ध करून दिले तर मुले अंगणवाडय़ांमध्ये रमतील, असेही त्यांनी सांगितले. या सर्वासाठी लागणारा निधी मिळावा यासाठी महिला बालकल्याण मंत्री वर्षां गायकवाड आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिल्याचे नंदा लोहबरे यांनी सांगितले.
जिल्ह्य़ात एकूण १ लाख ६२ हजार ३९४ इतकी बालके ० ते ६ वयोगटतील आहे. ९४.०६ टक्के बालके फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार साधारण श्रेणीतील आहे. मध्यम वजना असलेली ५.१३ टक्के तर ०.८२ टक्के कमी वजनाची आहेत. त्याचप्रमाणे २१६१ अंगणवाडी केंद्रांपैकी १०३२ अंगणवाडी केंद्रात स्वतंत्र इमारती आहेत.