बाजारातील जनावरांची वाढती आवक व गरज पाहून अकलूजचा जनावरांचा बाजार आठवडय़ातून दोनदा भरवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला असून, इथून पुढे हा बाजार सोमवारसह प्रत्येक गुरुवारीही भरणार आहे.
अकलूज येथील चौथ्या वर्षीच्या घोडे बाजाराचे उद्घाटन दिवाळी पाडव्याच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात राज्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांनी ही घोषणा प्रास्ताविकात केली. या वेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार हणमंत डोळस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात मदनसिंह यांनी अकलूजचा घोडे बाजार हा व्यापाऱ्यांना सर्वात जास्त सेवा व सुविधा देणारा भारतातील एकमेव बाजार असल्याचा दावा केला, तर आमदार हणमंत डोळस यांनी व्यापाऱ्यांनी त्यांना इतरत्र गुंडगिरीचा त्रास झाल्याने त्यांनी सुरक्षिततेसाठी स्वत:हून अकलूजचा भरवलेला हा बाजार असल्याचे सांगितले.
या वेळी विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले, की या बाजारात व्यापाऱ्यांना बाजार समितीकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे अल्पावधीत हा बाजार देशभरात प्रसिद्ध झाला असून, या ठिकाणी बाजार समिती घोडय़ाच्या व्यवहारात देणार-घेणार व घोडय़ाचा फोटोही पावतीवर छापत असल्याने वाद तर वाढत नाहीतच, शिवाय विश्वासार्हता वाढते.
शिवाय देशभरातून आलेले व स्थानिक व्यापाऱ्यांच्या घोडय़ांच्या चाली, रुबाब, देखणेपणाच्या स्पर्धा घेतल्या जातात. मात्र या स्पर्धा स्थानिक व व्यापारी अशा दोन गटांत घ्याव्यात, बाजार समितीच्या आठवडय़ातून दोनदा जनावरांचा बाजार भरवण्याच्या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले.
बाजार समितीचे उपाध्यक्ष सुभाष कुचेकर यांनी  उपस्थितांचे आभार मानले.